प्रदीप गुजराथी (रक्तदाते)
प्रदीप गुजराती हे एक मराठी कवी आहेत. ते मनमाडमध्ये राहतात व दूरसंचार विभागात काम करतात.
गुजराती हे रक्तदानाबद्दलचे काम करतात. लोकांना रक्तदानाचे आवाहन करीत असतानाच गुजराती यांनी स्वतः १०० वेळा रक्तदान केले. त्यांनी रक्तदात्याची सूचीही तयार केली असून त्यांनी या विषयावर रक्तदान..घोषवाक्य..उखाणे..आणखी बरेच... या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
रक्तदानावरील काव्य
संपादनगुजराती आपल्या साहित्यकृतीतून नेहमीच रक्तदानाविषयी प्रबोधन करतात.
माझा वसा रक्तदानाचा, मी रक्ताचे दान मागतो,
तुम्हीसुद्धा करा रक्तदान, मी रक्ताचे वाण मागतो।
अशा त्यांच्या अनेक कविता ते शिबिरांत सादर करतात. रक्तदाता देवदूत ...जातात पळून यमदूत किंवा करा रक्तदानाची घाई ...वाचेल कुणाची तरी आई, अशी काही घोषवाक्येही त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी रक्तदानाविषयी उखाणे तयार केले आहेत. चंद्राभोवती आहे तारकांचे रिंगण ..रावांनी बांधलं आहे, रक्तदानाचं कंकण किंवा मंदिरात मंदिर शंकराचे मंदिर, त्याला आहे सोन्याचा कळस, रक्तदान करताना ...राव कधी करत नाही आळस. असली ही साहित्यकृती रक्तदानाबाबतची जनजागृती सर्व स्तरापर्यंत करण्यास उपयोगी पडते.
रक्तदानाचा वसा
संपादन१९८५पासून गुजराती रक्तदानाच्या चळवळीत काम करत आहेत. त्यांनी अनकाई येथील आराधना उद्यान केंद्रातील जैन संत हसमुखमुनी यांच्या प्रेरणेने रक्तदानाला सुरुवात केली व नंतर १०० वेळा रक्तदान केले. मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, नाशिक तसेच वागदडीर्, वंजारवाडी यांसारख्या ग्रामीण परिसरात ते रक्तदान शिबिरांचे संयोजन सातत्याने करतात.
रक्तदानाचा प्रचार, प्रसार व्हावा व रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, तरुणांनी निर्भयपणे रक्तदान करून रक्तदानाची चळवळ वाढवावी, रुजवावी एवढाच प्रामाणिक हेतू यामागे आहे, असे ते प्रांजळपणे सांगतात. त्यांनी प्रकाशित केलेेले रक्तदानाविषयीचे पुस्तकना नफाना तोटा या तत्त्वावर प्रकाशित केले असून महाराष्ट्रातील सर्व रक्तदान शिबीर संयोजकांना, सर्व सामाजिक संस्थांना व रक्तपेढ्यांना ते पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकाआधी त्यांचा 'रक्तगंध' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून 'जीवन संजीवनी' ही रक्तदात्यांची सुची असलेली पुस्तिका त्यांनी संपादित केली आहे.
रक्तदान कोणी करावे? रक्तदानाची गरज काय? रक्ताचे महत्त्व, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील घोषवाक्ये, उखाणे, कविता यांचा समावेश असलेले त्यांचे पुस्तक मात्र सर्वांनाच उपयोगी आहे.
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचा निष्काम कर्मयोगी पुरस्कार
- ठाणे येथील रक्तानंद संस्थेचा रक्तकर्ण पुरस्कार
- धुळगावच्या सत्यवादी नागरी कृती समितीचा जीवन संजीवनी पुरस्कार
- मनमाड रोटरी क्लबचे रक्तकर्ण गौरव चिन्ह
- मुक्ताईनगर साहित्य संमेलनाचा जीवनदाता पुरस्कार
- नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीच्या संचालकपदी निवड
- शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्षपद.