प्रतिसरकारांची स्थापना

इ.स. १९४२ च्या चळवळीच्या प्रारभानंतर देशात ठीकठिकाणी शासकीय यंत्रणा मोडून पडल्यावर स्थानिक लोकांनी प्रतीसरकारे स्थापन करून प्रशासनाचे कार्य आपल्या हाती घेतले. इंग्रज सरकारच्या नियंञणाखाली असलेल्या विशिष्ट प्रदेशात भारतीयांनी स्वतःची शासनयंत्रणा निर्माण केली. त्यात प्रामुख्याने बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये भागलपूर , ओरिसात बालासुर , आंध्रमध्ये भिमावरम येथे स्थापन झालेल्या प्रतीसरकारांचा उल्लेख करावा लागेल. ही प्रतिसरकारे फार काळ टिकू शकली नाहीत. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. हे प्रतिसरकार दीर्घकाळ अस्तित्वात होते व इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते. साताऱ्याच्या या प्रतीसरकारांचा प्रारंभ मोर्चे व निदश॔नांनी झाला. सरकारने लाठीमार व गोळीबाराचा अवलंब करताच चळवळीने उग्र स्वरूप धारण केले. कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन व वेगवेगळ्या गटांचे आयोजन करून शासकीय खजिन्यावर व शस्त्रागारांवर शिस्तबद्ध पद्धतीने हल्ले करण्यास सुरुवात केली. क्रांतीसिंह नाना पाटील हे या गनिमी युद्धाचे मूळ सूत्रधार होते. ब्रिटिशाबरोबरच्या दीर्घकालीन युद्धाची त्यांनी पद्धतशीरपणे तयारी केली. तुरुंगातून निसटून आलेले किसन वीर व वसंतदादा पाटील या गटात सामील झाले . काही काळातच यशवंतराव चव्हाणही या गटाला येऊन मिळाले . सातारा येथे स्थापन झालेले प्रतिसरकार ' पञीसरकार ' म्हणूनही ओळखले जात होते. नाना पाटील आणि त्यांचे सहकारी जुलमी सावकार , अधिकारी आणि फितुरांना दोन्ही पाय बांधून टाचेवर काठीचे तडाखे मारण्याची कठोर शिक्षा देत असत. या शिक्षेला सामान्य लोक ' पत्री मारणे ' म्हणत . त्यावरून या सरकारलाही ' पत्रीसरकार ' म्हणून ओळखले जाऊ लागले.