कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे (जन्म : ८ फेब्रुवारी १९२१; - ११ सप्टेंबर २०१०) या एक मराठी कीर्तनकार आणि लेखिका होत्या.

कौटुंबिक माहिती आणि बालपण

संपादन

पुष्पलता रानडे यांचे आईवडील हैदराबादला असत. आई लक्ष्मीबाई लेले व मावशी कमलताई टिळक या दोघी लेखिका असून कीर्तने करीत. राजाभाऊ रानडे यांच्याशी लग्न करून त्या वयाच्या १५व्या वर्षी पुण्यात आल्या.

पुण्यात आल्यावर पुष्पलता रानडे यांनी शालेय शिक्षणाबरोबरच संगीताचे आणि नृत्याचे शिक्षण घेतले. त्याचा त्यांना कीर्तनकलेसाठी उपयोग झाला. त्याचबरोबर त्यांनी शिवणाचा, ग्रंथपालनाचा व मॉंटेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला तसेच मराठी साहित्यविशारद, हिंदी कोविद आदी पदव्याही त्यांनी संपादन केल्या.

रंगभूमीवरील भूमिका आणि दिग्दर्शन

संपादन

महाराष्ट्र कलोपासक संस्थेत रानडे यांनी पु.ल.देशपांडे, प्रभुदास भूपटकर, सेवा चौहान, भगवान पंडित, के.नारायण काळे यांच्या बरोबरकाम केले. पु.लं.च्या वयम्‌ मोठम्‌ खोटम्" या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

आर्थिक संकट आणि कीर्तनांतून त्यावर मात

संपादन

ऐन उमेदीच्या काळात पुष्पलता रानडे व पती राजाभाऊ रानडे ह्याना फार मोठ्या आर्थिक व सामाजिक आघातांना सामोरे जावे लागले. पण कीर्तनानेच त्यांना संकटकाळी आणि आर्थिक ओढग्रस्त परिस्थितीत आधार दिला.

कीर्तनाद्वारे त्यांना भरपूर पैसा मिळू लागला. पण त्याही परिस्थितीत कीर्तनाच्या उत्पन्‍नातील मोठा वाटा त्यांनी फक्त सामाजिक कार्यावरच खर्च केला. प्रापंचिक खर्चासाठी पती राजाभाऊंच्या मदतीने स्वतःच्या घरात लक्ष्मीरोडवर त्यांनी संजीवन नावाचा लॉज सुरू केला.

पुष्पलताबाईंचे दातृत्व

संपादन

पुष्पलता रानडे यांनी पन्नास वर्षांच्या काळात हजारो कीर्तने करून त्यांतून मिळालेल्या पैशातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थाना उभारणीसाठी व संवर्धनासाठी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या.

कर्तृत्व, वकृत्व ह्यांबरोबरच पुष्पलताबाई त्यांच्या सहज दातृत्वामुळे जनमानसात मान्यता पावल्या. त्यांनी आपल्या धनसंचयाचा समाजऋणाच्या भावनेतून उत्तम विनियोग केला. आपले पती राजाभाऊ रानडे यांच्या निधनानंतर सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे हताश होऊन न बसता स्थावर आणि जंगमाची योग्य निरवानिरव करून त्यातून प्राप्त झालेल्या धनाचा सदुपयोग करण्याचे व्रतच पुष्पलता रानडे यांनी घेतले होते.

वयोमानपरत्वे आता आपण कीर्तनांतून धनसंचय करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर दानधर्म हेच व्रत असल्यामुळे, ते केल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे ह्या जाणिवेने त्यांनी पुण्यातील लक्ष्मीरोडवरील ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीचे पेशवाई थाटाचे आपले ऐसपैस घर विकून व जवळील सर्व मौल्यवान वस्तूंच्या विक्रीतून मोठी रक्कम जमा केली व झपाटल्याप्रमाणे स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे अनेक संस्थाना अपत्यवत भावनेने योग्यता आणि गरज पाहून लहान-मोठ्या देणग्या देण्याचा सपाटा लावला.

सदाशिव पेठेत एक सदनिका व रोजच्या दैनंदिन उपजीविकेपुरता पैसा जवळ ठेवून बाकी सर्व रक्कम त्यांनी समाजकार्यासाठी मुक्तहस्ते वापरली. वास्तविक गरजू संस्था देणगीसाठी धनवंतांच्या शोधात असतात; पण येथे पुष्पलाताबाई सत्पात्र संस्थांच्या शोधात राहत व व्यवहारकुशलतेने एखादी संस्था जसे कार्य करेल तसे एकटीच्या हिमतीवर करत.

मृत्युपत्र

संपादन

पुढे पुढे पुष्पलताबाईंची दान-धर्माची ऊर्मी एवढी वाढली की आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना आवर घालावा लागला, व जो काही दानधर्म करायचा आहे तो आता इच्छापत्राद्वारे तुमच्या मृत्यूनंतर करावा अशी जाणीव त्यांना द्यावी लागली. जीवनभर आणि आपल्या मृत्युपत्राद्वारे जीवनपश्चात त्यांनी आपली पै अन्‌ पैची सर्व मालमत्ता कोणताही अपवाद न ठेवता फक्त सामाजिक पुरस्कार व शिष्यवृत्तींसाठीच व्यतीत करावी अशी उत्तम व्यवस्था करून ठेवून समाजाला एक उद्बोधक आदर्श घालून दिला.

नव्वद वर्षांचे कृतार्थ जीवन जगणाऱ्या पुष्पलता रानडे या उभ्या महाराष्ट्राला लेखिका, कवयित्री, दानवीर व कीर्तनकार म्हणून परिचित झाल्या.

पुष्पलता रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
 • आठवणीच्या हिंदोळ्यावर
 • कीर्तन कमल
 • गजरा
 • गाऊ त्यांच्या आरती
 • स्मृतिगंध

स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार

संपादन

प्रत्येकी पन्‍नास हजार ते दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

 • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे जिद्द पुरस्कार
 • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन पुरस्कार
 • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस पुरस्कार
 • मसापतर्फे उत्कृष्ट आत्मचरित्रासाठी दिला जाणारा कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक वार्षिक पुरस्कार
 • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे विशेष कलागौरव पुरस्कार
 • कीर्तन संजीवनी’ पुष्पलता रानडे विशेष गौरव सन्मान
 • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे सेवागौरव पुरस्कार

पुरस्कारांचे आजवरचे मानकरी

संपादन

जिद्द पुरस्काराचे मानकरी

संपादन
 • आकांक्षा व आनंद देशपांडे

संशोधन पुरस्काराचे मानकरी

संपादन
 • डॉ. सुमन सहाय, प्राणिशास्त्रज्ञ डॉ. सरोज घासकडवी, नागपूरच्या डॉ. नंदिनी भोजराज, पुण्यातील डॉ. विद्या गुप्ता

साहस पुरस्काराचे मानकरी

संपादन
 • रितू बिहाणी, सुरेश रानडे, जयश्री रानडे, ॲडव्होकेट फ्लेव्हिया ॲग्नेस, उमाताई पवार, हरमाला गुप्ता, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला परांजपे,

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

संपादन
 • हुमान धायगुडे यांना

विशेष कलागौरव पुरस्कार

संपादन
 • भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांना

विशेष गौरव सन्मान

संपादन
 • संस्कृत अभ्यासक प्रा. सुमन दत्तात्रेय महादेवकर, सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई कांबळे, प्रसाद प्रकाशनच्या उमा बोडस, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे डॉ. शेखर कुलकर्णी, ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ.गो. धर्माधिकारी

सेवागौरव पुरस्कार

संपादन
 • रुग्णमित्र अरुण कोंडेजकर यांना

पुष्पलता रानडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

संपादन
 • जगदगुरू शंकराचार्यानी आदर्श कीर्तनकार म्हणून त्यांचा गौरव केला.
 • गोवा कला अकादमीतर्फे "कीर्तन संजीवनी" ही उपाधी त्यांना देण्यात आली.
 • पुष्पलता रानडे यांच्या जीवनावर आधारित "तेजशलाका' हा माहितीपट निघाला आहे.
 • तसेच इतरही अनेक मानसन्मान त्यांना लाभले.