पीट
याचा समावेश दगडी कोळशात करीत नाहीत, परंतु वनस्पतिज पदार्थांचे कोळशात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे पीट तयार होणे हा होय, असे मानले जाते. म्हणून त्याचा समावेश येथे केलेला आहे. पिटाचा रंग तपकिरी, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. ते सच्छिद्र असून त्याची संरचना तंतुमय किंवा काष्ठमय असते. ते कमीअधिक कुजलेल्या वनस्पतिज पदार्थांचे बनलेले असल्यामुळे त्याच्यात पाने, फांद्या अथवा लाकूड यांसारखे छिन्नविछिन्न व अर्धवट कुजलेले वनस्पतींचे अवशेष असतात.
दलदलीत किंवा पाणथळ जमिनीतील तळ्यात व डबक्यात वनस्पतींची पाने, फांद्या, फुले, फळे इ. भाग साचत राहून तयार झालेल्या राशींपासून पीट तयार झालेले असते. अशा दमट पाणथळ परिस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडतो किंवा होतही नाही. शिवाय काही पूतिरोधक (जंतुनाशक) कार्बनी अम्ले तयार होत असतात. त्यामुळे सूक्ष्मजंतू किंवा कवके (बुरशी सारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) यांच्या क्रियांना पायबंद बसतो. अशा परिस्थितीत वनस्पतींच्या मऊ भागांचे व चटणीप्रमाणे बारीक चूर्ण झालेल्या भागांचे ह्यूमस नावाच्या जेलीसारख्या पदार्थामध्ये परिवर्तन होते. मृत वनस्पतिज पदार्थांची जी राशी साचलेली असते तिच्यातील घटकांवर ह्यूमसाचा लेप बसतो. त्या पदार्थातील छिद्रातही ह्यूमस शिरते आणि त्याचा लेप बसतो. असा ह्यूमसचा लेप बसलेले पदार्थ अधिक न कुजता तसेच राहतात व ते साचून पीट तयार होते.
शीत किंवा समशीतोष्ण व दमट जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असलेल्या पुष्कळ क्षेत्रांत पीट तयार झालेले आढळते. त्या प्रदेशांतील जलवायुमानात वनस्पती वाढण्याच्या वेग कुजण्याच्या वेगापेक्षा अधिक असतो म्हणून पीट साचू शकते. गंगेच्या किंवा इतर कित्येक त्रिभुज प्रदेशांत खणलेल्या विहीरींत एका खाली एक असे गाळात पुरले गेलेले पिटाचे थर आढळले आहेत.
निरनिराळ्या जलवायुमानाच्या क्षेत्रांतील वनस्पती निरनिराळ्या असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रांतले पीट निरनिराळ्या वनस्पतींचे बनलेले असते. उदा., टंड्रा प्रदेशातील पीट मुख्यतः रेनडियर मॉस नावाच्या दगड फुलाचे बनलेले असते. इतर प्रदेशांतील पीट दलदली जमिनीत किंवा पाण्यात वाढणाऱ्या झाडाझुडपांची पाने, फांद्या, खोडे इत्यादींच्या अवशेषांचे बनलेले असते.
वनस्पतिज पदार्थ साचत राहिले म्हणजे वरच्या थराचा भार पडत राहून खालचे थर दाबले जातात व त्यांच्यातील पाणी बाहेर घालविले जाते. ते संकोच पावून टणक होतात व त्यांचे परिपक्व पीट बनते. अशा तऱ्हेने तयार झालेले पीट गाळाखाली पुरले गेले म्हणजे ते अधिक टणक होते व त्याच्यापासून दगडी कोळशाचे सामान्य प्रकार तयार होतात [→ पीट].