पार्वतीनंदन गणपती हा पुणे शहरातील सेनापती बापट रोडवर चतुःशृंगी मंदिराजवळचे देऊळ आहे. गणेश खिंडीतील चतुःशृंगीच्या देवळाकडून विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बोळात असेलेले हे मंदिर फार जुने आहे.

देवळाच्या समोर तीन दगडी दीपमाळा आहेत. देवळात प्रवेश करताना उजवीकडे तोंड केलेला व शेपूट उंचावलेला दुर्मिळ मारुतीही आहे. या गणपतीची मूर्ती अडीच ते तीन फूट उंचीची असून, शेंदूरचर्चित व चतुर्भुज आहे. मूर्तीला अंगचा दगडी मुकुट आहे.

पुण्यातील ५६ नावाजलेल्या गणपतीच्या देवळांमध्ये पार्वतीनंदन मंदिराची गणना होते. सतराव्या शतकामध्ये पुण्याजवळच्या पाषाण गावाचे निवासी शिवरामभट्ट चित्राव यांनी मंदिरातील दुरुस्त्या करून घेतल्या. त्या ठिकाणी विहिरीतील गाळ उपसताना शिवरामभट्ट चित्रावांना तळाशी खजिना सापडला, तो त्यांनी बाजीराव पेशव्यांकडे सुपूर्त केला. पेशव्यांनी तो खजिना मंदिराच्या देखभालीसाठी वापरण्याचे सुचवले, व त्यानुसार नानासाहेब पेशवे यांनी दरवर्षाला एक हजार ८८० रुपयांची तरतूद केली.


पुण्याची वाढ होत गेली तसे मंदिराच्या परिसरात बहुमजली इमारती उभ्या राहिल्या; मंदिर लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त झाले; घडीव दगडांवर तैलरंगांचे थर चढले; शहाबादी फरशांच्या जागी सिमेंटच्या टाइल्स आल्या, मंदिराच्या परिसरात स्टेनलेस स्टीलची बाके आली; जुन्या लाकूडकामाची रया गेली आणि जुन्या बांधणीचे पार्वतीनंदन नावाचे ऐतिहासिक गणेश मंदिर कुरूप झाले.

पुण्यातील एका व्यावसायिकाने मंदिराला पुन्हा जुने रूप देण्याचे ठरवले आणि वास्तुविशारद किरण आणि अंजली कलमदाने यांच्याकडे ते काम सोपवले. या मंडळींनी काळ्या पाषाणावरील तैलरंगांचे थर उतरवले व तुटक्या दगडांच्या जागी नव्याने घडवलेले ताशीव दगड बसवले. खराब झालेली लाकडी कामे बदलली व मंदिराला बंदिस्त करणाऱ्या जाळ्या काढून टाकल्या. गणपतीच्या मूर्तीसमोरील लाकडी कमानींवरील तैलरंग काढून टाकल्यावर त्यांवरील कोरीवकाम उठावदारपणे दिसू लागले. कमानींमधील बांधकाम पाडून टाकल्याने या भागात उजेड आणि मोकळी हवा खेळू लागली, आणि शेवटी २०१५ साली मंदिर पुनः जुन्यासारखे झाले.

या कामासाठी युनेस्को एशिया पॅसिफिक संस्थेने कलमदानी दांपत्याचा ’ऑनरेबल मेन्शन’ हा पुरस्कार देऊन गौरव केला.