अद्वैत वेदान्तानुसार आपणा सर्वांमध्ये एकच आत्मतत्त्व आहे. पण आपण स्वतःला एका शरीरापुरतेच मर्यादित समजतो. ज्यावेळी इतर सर्व प्राणिमात्रांबद्दल आपल्याला स्वतःइतकीच आत्मीयता वाटू लागेल, हे विश्वचि माझे घर" वाटू लागेल त्यावेळी त्या आत्मतत्त्वाचा आपणास अनुभव येऊ लागेल. मग स्वार्थ, क्रोधादी विकार उरणारच नाही कारण हे विकार संकुचितपणामुळेच निर्माण होतात. पण अशी सर्व प्राणिमात्रांबद्दल आत्मीयता वाटू लागण्याची इच्छा उत्पन्न कधी होईल? ही इच्छा उत्पन्न होणे, हेच फार मोठे साध्य आहे. "बहुता सुकृताची जोडी । तरी विठ्ठली आवडी ।. " असे श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. विठ्ठलाबद्दल म्हणजेच सर्वात्मक आत्मतत्त्वाबद्दल आवड निर्माण होणे, यासाठी मोठे पुण्य लागते. जेव्हा अशी आवड माझ्या मनात निर्माण होत नाहीय, माझ्या संकोचितपणाबद्दल म्हणजे शरीरापुरतेच स्वतःचे अस्तित्त्व मानण्याबद्दल मला काहीही खंत वाटत नाहीय, याविषयी टोचणी निर्माण होणे, ही पारमार्थिक विरहाची सुरुवात होय. व्यावहारिक दृष्ट्यासुद्धा जो फक्त स्वतःपुरते बघतो, तो अप्रिय ठरतो. त्याला सर्व सुखाची साधने ही फक्त आपल्यालाच मिळावी, असे वाटते, त्यासाठी तो विहित मार्गाबरोबर अविहित मार्गाचाही अवलंब करण्यास तयार होतो. अर्थातच स्वार्थ बोकाळून भ्रष्टाचार वाढतो. पण जो स्वतःच्या सुखाबरोबर इतरांच्याही सुखाचा विचार करतो, तो सर्वांना हवहवासा वाटतो. खरे तर सुखाची साधने का मिळवायची, आनंदासाठीच ना, हा आनंद संकोचित वृत्तीच्या माणसाला उपभोगताच येत नाही, जो सगळ्यांसाठी झटतो, त्याला शोधत समाधान येते. याचाच अर्थ असा की सर्वात्मकतेतच खरा आनंद आहे. म्हणून सर्वात्मक परमेश्वर आनंदमय आहे. तर या परमेश्वराशी एकरस होण्याची ओढ निर्माण होणे, आपल्याला तसे अजून एकरस होता येत नाहीय, याबद्दल अतिशय वाईट वाटणे, हाच पारमार्थिक विरह होय. श्रीतुकोबाराय म्हणतात, "ऐसे भाग्य कै लाहता होईन । अवघे देखे जन ब्रह्मरूप ।। " सर्व लोकांमध्ये ते एकच आत्मतत्त्व भरलेले मला कधी जाणवेल, याविषयी प्रचंड ओढ लागलेले तुकोबा पारमार्थिक विरहाने नुसते तळमळत होते. प्रत्येक संत या पारमार्थिक विरहात होरपळूनच संतपदास पोचले आहेत. जेव्हा त्यांना खरेच सर्वांमधल्या एकात्मतेची अनुभूती येते, तेव्हा त्यांची ही विरहावस्था संपून आत्यंतिक आनंद प्राप्त होतो. सर्वात्मक परमेश्वराशी ते एकरूप होतात.

 आपल्याला अशा संतपदास जरी पोचता आले नाही, तरी निदान आपल्यात असलेल्या आप्पलपोटेपणाची तरी खंत वाटावी, हा पारमार्थिक विरहाचा पहिला टप्पा मानता येईल!
                                                                                                                                       -- अनुराधा