पाटणा हे स्कॉटलंडमधील एक खेडेगाव आहे. या गावाची वस्ती २०१५ साली साडे तीन हजार होती. हे गाव भारतातल्या बिहार राज्यातील पाटण्यापासून १०.००० किलोमीटर अंतरावर आहे.

लाकडी आणि सिमेंटची एकमजली आणि दुमजली घरे असलेले हे छोटेसे टुमदार पाटणा नावाचे गाव दूम नदीच्या काठी वसले आहे.

पाटणा गावाची निर्मिती संपादन

स्कॉटलंडमधील इस्ट एरशेर प्रांतातील या पाटण्याची पायाभरणी विल्यम फुलर्टन याने केली. त्याचा जन्म इसवीसन १७७४ साली बिहारमधील पाटणा शहरात झाला होता. विल्यमच्या काकांचेही नाव विल्यम फुलर्टन असेच होते. ते ईस्ट इंडिया कंपनीचेे सर्जन होते. त्यांनी नोकरीचा काही काळ भारतातील कलकत्त्यात घालवला होता. त्यांचे धाकटे बंधू म्हणजचे विल्यमचे वडील मेजर जनरल जॉन फुलर्टन हे सुद्धा भारतात ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांचे इ. स. १८०४ मध्ये भारतात निधन झाले. तत्पूर्वी, काका विल्यम हे इ. स. १७७० मध्ये स्कॉटलंडमध्ये परतले. त्यांनी एरशेर प्रांतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अविवाहित असलेल्या काकासोबत विल्यम याने एरशेर प्रांतात दून नदीकाठी कोळसाखाणीचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यावेळी त्याचे वय होते २४ वर्षे. दून नदीकाठी त्याने सहा कोळसा आणि डझनभर लोखंडाच्या खाणी सुरू केल्या. या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी नवे गाव वसविले आणि त्याला आपले जन्मगाव असलेल्या पाटणा शहराचे नाव दिले.

पाटण्याचा विकास करणारे विल्यम फुलर्टन संपादन

पाटणा गावातील कोळ्शाच्या खाणी पूूर्णपणे बंद होण्यापूर्वीच विल्यम यांच्यामुळे या भागाचा विकास झाला होता. त्यांच्याच काळात इसवीसन १८०५ मध्ये दून नदीवर पहिला पूल उभारण्यात आला. खाणीतील कोळसा वॅगनद्वारे वाहून नेण्यासाठी रेल्वेचे रूळ टाकण्यात आले. या रुळांवरून प्रवासी वाहतूकही सुरू झाली. १८५६ मध्ये रेल्वे स्टेशन तयार झाले. पुढे विल्यमने पाटणा सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने खाण कंपनी विकून स्कॉटलंमधीलच अयर येथे स्थलांतर केले. तेथे त्याची राजकीय कारकीर्द बहरली. तो १८२३-२५ आणि १८३०-३४ असे दोन वेळा स्थानिक निवडणुकांमध्ये निवडून आला. सत्तेत सहभागीही झाला. विल्यमचे १८३५ मध्ये निधन झाले.

पुढे खाण व्यवसाय बंद पडल्याने आणि रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने पाटणा गावातील नागरिक इस्ट एरशेरमधील अन्य शहरांकडे गेले. गावातील प्रवासी रेल्वे वाहतूक तर १९६४ मध्येच बंद झाली.

प्रसिद्धी संपादन

युरोपातील प्रसिद्ध कवी रॉबर्ट बर्न्स यानी याच दूूम नदीकाठी बसून कविता लिहिल्या. या कविता स्कॉटलंडमधील शाळांमध्ये शिकविल्या गेल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना तोंडपाठ असतात. रॉबर्ट बर्न्समुळे हे गाव नावारूपाला आले आहे.

ज्या शहरामुळे आपल्या गावाला नाव मिळाले त्या मूळ पाटण्याचे येथील विद्यार्थ्यांना प्रचंड आकर्षण आहे. शाळेच्या मुख्य इमारतीत गावाला मिळालेल्या पाटणा नावाची माहितीही आवर्जून नमूद करण्यात आली आहे.