पहाडपूर हे बांगला देशातील पालकालीन अवशेषांचे एक स्थळ आहे. धर्मपाल राजाने (आठवे-नववे शतक) सोमपूर नावाचे नगर वसविले. पहाडपूरचे अवशेष हे सोमपूरचे असावेत असे मानले जाते. १९२६–३४ या काळात येथे उत्खनने झाली. त्यांत विटांच्या अनेक चौथऱ्यांवर बांधलेल्या देवळांचे अवशेष मिळाले. येथील एका देवळाची उंची सु. ३० मी. असून देवळाच्या चौथऱ्यावर चारी बाजूंस घडीव वीटकामातील अनेक मूर्ती बसविलेल्या आढळून आल्या. उपलब्ध मूर्तींत तीन हजार मातीच्या असून सु. साठ दगडी मूर्ती आहेत.त्यांत हिंदू आणि बौद्ध देव-देवतांच्या मूर्ती होत्या. देवळाभोवती विहार होता. त्यात अनेक खोल्या होत्या. याशिवाय बौद्ध देवता तारा हिचे स्वतंत्र मंदिर आणि अनेक लहान स्तूपही मिळाले. अशाच तऱ्हेची चौथऱ्यावर बांधलेली मंदिरे आग्नेय आशियात प्रचलित आहेत.