पर्णसंभार
पाने
संपादन
खोडाचा अन्ननिर्मितीसाठी रूपांतरीत झालेला भाग म्हणजे पाने. पानांना एकत्रितपणे पल्लवी किंवा पर्णसंभार असेही म्हणले जाते.
पानांचे मुख्य कार्य प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून अन्ननिर्मिती हे असले तरी आपल्या हिरवाईने झाडाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे कामही पाने करतात. हरितद्र्व्याच्या उपस्थितीमुळे पानांचा रंग मुख्यतः हिरवा असतो परंतु काहीवेळा इतर रंगद्रव्यांच्या प्राबल्यामुळे रंगीबेरंगी पानेही पहायला मिळतात. पानांच्या आकारात तसेच इतर गुणांमधे मोठी विविधता आढळते. काही पाने अतिशय सूक्ष्म तर काही अतिशय मोठी असतात.
पानांची मांडणी (पर्णविन्यास), पानांची रचना, आकार, पर्णाग्र, पानांच्या कडा या सर्व वैशिष्ट्यांना वनस्पतींच्या वर्गीकरणात अतिशय महत्त्व आहे.
पानाचे भाग (Components of leaf)
- देठ / पर्णवृंत (Petiole)
सामान्यतः पानाचे दोन भाग असतात- देठ आणि पाते. बहुतांशी पानांना देठ असतो त्यांना सवृंत पाने (Petiolate leaves) म्हणतात, परंतु काही पाने देठविरहीत असतात त्यांना अवृंत पाने (Sessile Leaves) म्हणतात.
वनस्पतीच्या संरक्षण, आधार, अन्नसंचय, अन्ननिर्मिती यांसारख्या विविध कार्यांसाठी काही वेळेस देठाचे रूपांतर पंखाकृति रचना, ताणे, वृन्तपर्ण (Phyllode) यांत होते.
उदाहरणार्थ:
१. लिंबूवर्गीय वनस्पतींमधे पंखाकृति देठ (Winged Petiole) असतो.
२. जलपर्णी मधे पाण्यात तरंगण्यासाठी फुगीर देठ (Swollen Petiole) असतो.
३. ऑस्ट्रेलियन बाभूळ या वृक्षाच्या पानांचे देठ अन्ननिर्मितीसाठी चपट्या वृन्तपर्णात रूपांतरीत होतात.
- उपपर्ण (Stipule)
पानाच्या देठाच्या खालच्या बाजूस दोन उपपर्णांची( लहान पानांची) जोडी असते. उपपर्णे मुख्यतः पानांच्या खाचेत उगवणाऱ्या पर्णकलिका आणि पुष्पकलिकांच्या संरक्षणाचे काम करतात. ज्या पानांमधे उपपर्ण नसते त्यांना अनुपपर्ण म्हणतात. काही वेळेस वनस्पतीच्या गरजेनुसार उपपर्णांचे रूपांतर काटे, ताणे, पंखाकृति रचना यांमधे होते. उपपर्णांचे अस्तित्त्व, रचना, रूपांतरे या गोष्टी जातिविशिष्ट असतात त्यामुळे वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्रात त्यांना अत्यंत महत्त्व असते.
उदाहरणार्थ:
१. कदंबकुलातील (Family-Rubiaceae) अंतरावृन्तीय उपपर्ण (Interpetiolar Sipule) हे त्या कुळाचे वैशिष्ट्य आहे.
२. बोर, खैर, बाभुळ या वनस्पतींमधे उपपर्णांचे रूपांतर काट्यांत झालेले असते.
३. वाटाण्याच्या वेलांत पंखाकृति उपपर्ण दिसते.