परांडा किल्ला

१५ व्या शतकातील भारतीय किल्ला
(परंडा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

परांडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा शहरात स्थित आहे. हा भुईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे. कल्याणीच्या मरहटा चालुक्याच्या काळात परिंडा (परांडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान ने तो बांधला. []

इतिहास

संपादन

हा किल्ला बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगरच्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगरच्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.[] काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली. इ.स. १६२९ ते १६३२ च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता, नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला होता.

कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात परिमंडा (परांडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२९ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३२ मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.

वैशिष्ट्ये

संपादन

हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी 'मुलुख मैदान तोफ' होती. विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नृसिंह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे. []

संदर्भ

संपादन