पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी, आज रस्त्यावर चालणाऱ्या गारुड्याच्या किंवा डोंबाऱ्याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही; ते निर्हेतुक असूच शकत नाही. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणाऱ्या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादांतून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्‍न असतो.

दर वर्षी पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाट्यसमर्पित ह्या संस्थेतर्फे अहमदनगरचे डॉ.रवींद्र चव्हाण हे राज्यपातळीवर पथनाट्य स्पर्धा घेतात. यापूर्वी भोपाळमध्ये १९८४ साली तिथल्या रंगमंडल या संस्थेने अखिल भारतीय पथनाट्य शिबिर भरवले होते. मुंबईच्या जागर ह्या संस्थेने अनेक पथनाट्ये सादर केली आहेत. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्या संस्थेने मुंबईच्या बोरीबंदरजवळ एक पथनाट्य सादर केले होते. पोलिसांनी हातात दंडुके घेऊन तो नाट्यप्रयोग बंद पाडायचा प्रयत्‍न केला. परंतु जमावाने पोलिसांना अडवले आणि 'रिंगणाच्या आत पाऊल टाकाल तर खबरदार' असा दम दिला होता, आणि पोलिसांना माघार घेणे भाग पाडले होते. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील भूकंपाच्या वेळी प्रा. दिलीप महालिंगे यांनी " जादुगार " या पथनाट्याचे जवळपास ५०० प्रयोग करून त्यातून मिळालेली रक्कम भूकंपग्रस्तांना दिली होती. या भूकंपाची तीव्रता इतकी अधिक होती की, प्रत्येकाला बाधितांसाठी काहीतरी करावे वाटत होते. एका भिकारी महिलेने हे पथनाट्य पाहून तिच्या झोळीत असलेले सर्व पैसे या पथनाट्य कलावंताच्या झोळीत टाकले होते.

लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी समाजोपयोगी ज्वलंत विषयांवर पथनाट्ये लिहिली आणि जनजागृतीसाठी ती संपूर्ण महाराष्ट्रात सादर केली. यातील काही लोकप्रिय पथनाट्ये खालील प्रमाणे आहेत[][][]:

  • 'सोयऱ्याला धडा शिकवा' - हुंडा प्रथे विरुद्ध असलेल्या कायदयाबद्दल समाजात जागरूकता
  • 'हुंड्या पायी घडल सारं' - हुंडाप्रथेचे दुष्परिणाम आणि निर्माण होणाऱ्या समस्या[]
  • 'दारू सुटली चालना भेटली' - व्यसन मुक्तीतून होणारे फायदे तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी
  • 'दारूचा झटका संसाराला फटका' - दारूच्या व्यसनामुळे उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांविषयी जागरूकता.
  • 'मनाला आला एड्स टाळा'- एड्सची कारणे आणि कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल समाजात जागरूकता.
  • ‘बुवाबाजी ऐका माझी' - अंधश्रद्धा निर्मूलन आणि बुवाबाजी विरुद्ध जागरूकता.


महाराष्ट्राखेरीज बंगाल, मणिपूर व केरळ या राज्यांत पथनाट्य चळवळ जोमात आहे. ब्रूनो एकार्ड्‌ट, बॉब अर्न्सट्थल पीटर स्च्यूमन या तिघांनी १९६३मध्ये अमेरिकेत न्यू यॉर्क येथे स्थापन केलेल्या ’ब्रेड अँड पपेट थिएटर'तर्फे जगभर पथनाट्ये होतात. व्हिएटनामच्या युद्धाविरुद्ध जनमानस तयार करण्यासाठी या संस्थेने अथेन्स, आयर्लन्ड, इटली, उत्तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बार्सिलोना आणि लॅटिन अमेरिकेत अनेक पथनाट्ये सादर केली होती. भारतातील पथनाट्य चळवळीचा इतिहास हा सफदर हाश्मी यांच्या योगदानाच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही . जवळपास ४००० पथनाट्याचे प्रयोग करणाऱ्या या रंगकर्मीला " हल्ला बोल " या पथनाट्याचे सादरीकरण करताना मृत्यूने कवटाळले. सफदरला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले गेले . पथनाट्या ह्याला सडक नाटक तसेच नुक्कडनाटक म्हणूनही ओळखले जाते.

विक्रम फलटणकर यांनी दोनशेहून अधिक पथनाट्यांची कथानके लिहिली आहेत प्रत्येक वर्षी त्यांचे पथनाट्याचे प्रयोग होतात त्यांची पथनाट्य एक रंगमंच नावाची एक संस्था आहे. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईमध्ये विक्रम फलटणकर यांनी 'विक्रम फलटणकर प्रेजेंट्स एक न संपणारे पर्व पथनाट्य' नावाच्या एका रंगमंचाची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी साडेचार हजाराहून अधिक पथनाट्य सादर केली आहेत

गाजलेली मराठी पथनाट्ये

संपादन
  • कथा रेशनच्या गोंधळाची -ज्योती म्हापसेकर
  • सोयऱ्याला धडा शिकवा - लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर)[]
  • जादुगार - दिलीप महालिंगे
  • देवाचिये द्वारी मानवाची स्वारी - दिलीप महालिंगे
  • दारू सुटली चालना भेटली - लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर)[]
  • आम्ही लेकी कष्टकऱ्याच्या- रा.रं.बोराडे
  • दारूमुक्त भारत - दिग्दर्शक डॉ. हरीष टाटिया
  • बापरे बाप -ज्योती म्हापसेकर
  • मनाला आला एड्स टाळा- लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर)
  • मराठी शाळांचा आग्रह धरणारी आणि गरज सांगणारी अनेक पथनाट्ये
  • मुलगी झाली हो- ज्योती म्हापसेकर
  • शेंगदाणा -दीपक ढोणे
  • हुंडा नको गं बाई -ज्योती म्हापसेकर
  • बोंबा मारी शेंबड -विक्रम फलटणकर
  • श्रद्धा कि अंधश्रद्धा- (विक्रम फलटणकर)

संदर्भ

संपादन
  1. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)" Archived 2019-06-03 at the Wayback Machine., दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
  2. ^ "लोकाश्रय लाभलेले लोकशाहीर बी. के. मोमीन - कवठेकर", “दै. पुढारी, पुणे”, २३-एप्रिल-२०१५
  3. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2019”
  4. ^ “बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै.लोकमत", Pune, 22-Nov-2021.
  5. ^ “एका लोकशाहिराचा उचित सन्मान”, "दै. पुण्यनगरी", मुंबई, 31-जानेवारी-2019.
  6. ^ “मोमीन यांनी समाजच्या वेदना साहित्यातून मांडल्या - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै. पुण्यनगरी",पुणे, 23-नोव्हेंबर-2021