पतंगराव कदम

भारतीय राजकारणी

पतंगराव कदम (जन्म : सोनसळ-सांगली, ८ जानेवारी, इ.स. १९४४; - मुंबई, – ९ मार्च इ.स. २०१८) हे मराठी राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्री होते.

बालपण आणि शिक्षण

संपादन

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आणि काहीशा दुर्गम , दुष्काळग्रस्त ८०० लोकसंख्या असलेल्या ' सोनसळ ' या छोट्याशा गावात एका लहान शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज , सातारा येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला .'रयत'च्याच हडपसर , पुणे येथील साधना विद्यालयात अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी '१९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर मॅनेजमेंट गुरू डॉ. प्र . चिं . शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच . डी . पदवी संपादन केली .

राजकीय वाटचाल

संपादन

पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात. यशवंतराव चव्हाण साहेब यांची जन्मभूमी असलेल्या भिलवडी - वांगी मतदारसंघातून १९८५ साली आमदार म्हणून निवड झाली .१९९० साली भिलवडी - वांगी मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाली . १९९० मध्ये प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले. १९९२ साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले . पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव अविभाज्य घटक होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. नोव्हेंबर २००४मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले. मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांच्याकडे वन, मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अघळपघळ, आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे, हा त्यांचा स्वभावविशेष होता.

लोकप्रिय नेता

संपादन

पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार, पण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते अजिबात मागेपुढे पाहत नसत. मात्र, रोखठोकपणामुळे काही वेळा अडचणीतही येत. मदत आणि पुनर्वसन खात्यामार्फत त्यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठी मदत केली. म्हैसाळ योजनेचे वीजबिल मदत आणि पुनर्वसन विभागाच्या योजनांतून भागवीत. त्यांचा मतदारसंघही दुष्काळी भागात मोडत असे. तेथे साखळी बंधाऱ्यांची योजना राबवून कदम यांनी तेथील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजना मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पलूस येथे औद्योगिक वसाहत उभारली. तेथे वाइन प्रकल्प चालवून रोजगारनिर्मितीचाही प्रयत्न त्यांनी केला. मुलगा अभिजित याच्या अपघाती मृत्यूमुळे झालेल्या आघातातून सावरत त्यांनी राजकीय काम पुढे सुरूच ठेवले. गटातटाच्या राजकारणामुळे सांगली महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली असतानाच २०१६ सालच्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेऊन तेथे काँग्रेसला सत्तेत आणले. काँग्रेसशी ते अखेरपर्यंत निष्ठावंत होते.

शैक्षणिक कार्य

संपादन

डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ विशीत असताना १९६४ मध्ये पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. १९६८ साली एरंडवणे ,पुणे येथे शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापना केली .एरंडवणे , पुणे येथे यशवंतराव मोहिते महाविद्यालय , लॉंॅं कॉलेज व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना करून भारती विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला . १९८३ साली डॉ . वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने धनकवडी , पुणे येथे इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली . आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. स्थापनेनंतरच्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत, त्यांत दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये नवी दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. भारती विद्यापीठ ही भारतातलया नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरशः साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना पतंगरावांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले.

  • डॉ. कदम काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून गेले होते.[]
  • डॉ. कदम याणी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड (भारती सहकारी) बँक, पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे.

विविध समित्यांवरील सदस्यपदे

संपादन
  • बोर्ड ऑफ डायरेक्टर : महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ
  • सेनेट आणि कार्यकारिणी सदस्य, पुणे विद्यापीठ
  • सेनेट आणि कार्यकारिणी सदस्य, मुंबई विद्यापीठ
  • महाराष्ट्र राज्याच्या विविध समित्या आणि उपसमित्यांचे कायदेशीर सल्लागार
  • कुलपतिद्वारा नियुक्त शिवाजी विद्यापीठाचे सिनट सदस्य
  • कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सभासद
  • पुण्यातील सिम्बोयसिस एज्युकेशन संस्थेचे सदस्य.

पुरस्कार

संपादन

त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-11 रोजी पाहिले.