पंतनगर
मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथे रशियन कामगार वसाहतीच्या धर्तीवर म्हाडाने (तेव्हाचे हाउसिंग बोर्ड) १९६० च्या दशकात पंतनगर नावाची वसाहत उभारली. भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावावरून या वसाहतीचे नाव ठेवण्यात आले आहे. कामगारांसाठी ही वसाहत असल्याने येथे गिरणी, खाण आणि गोदी यांमधील कामगारांची संख्या मोठी होती. पंतनगरमध्ये एक मोठी पोलीस वसाहतदेखील आहे. कामगार नेते कै.डॉ. दत्ता सामंत याचे घर आणि दवाखाना या वसाहतीत होता. दवाखान्यात येणाऱ्या कामगाराच्या समस्या जाणून घेता-घेता त्यांनी कामगार चळवळ उभारली. यामुळे पंतनगरमध्ये अनेक कामगार चळवळींचे रणशिंग फुंकले गेले. पुढे मुंबईतील खाणी बंद झाल्या आणि खाण कामगारही कमी झाले. गिरण्यांच्या ऐतिहासिक संपानंतर गिरणीकामगारही पंतनगरमधून बाहेर पडले. सुरुवातील मराठी लोकांखालोखाल दाक्षिणात्यांची लोकसंख्या होती. मात्र कामगार संपल्यावर येथील मराठी लोकसंख्या कमी होऊन गुजराती लोकसंख्या वाढली.
शैक्षणिक
संपादनपंतनगरमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचे मल्टिपरपज टेक्निकल हायस्कूल, मराठी विद्यालय, महाराष्ट्र मंडळ या तीन खासगी मराठी शाळा तर डॉमनिक हायस्कूल ही खासगी इंग्रजी शाळा आहे. त्याच बरोबर पालिकेच्याही मराठी आणि हिंदी भाषिक शाळा आहेत. पंतनगरमधील दोन पिढ्या या शाळांमध्ये शिकल्या असून शिवसेनेचे खासदार व दैनिक सामनाचे (शिवसेना या संघटनेचे मुखपत्र) कार्यकारी संपादक संजय राऊत हे पंतनगरमधील रहिवाशी होते.
राजकीय
संपादनडॉ.दत्ता सामंत यांनी पंतनगरमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना करून येथील मराठी कामगारांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. कै.दत्ता सामंत यांनी पंतनगरमधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. तिच्यात ते निवडून आले. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ.विनीता सामंत यादेखील काही काळ नगरसेविका होत्या. त्यांच्यानंतर या परिसरात शिवसेनेचे वर्चस्व झाले. पुढे राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या राखी जाधव या पंतनगरच्या नगरसेविका झाल्या आणि भाजपचे प्रकाश मेहता हे आमदार.