नेव्हर डन पुअरली पेड'[] हे जयती घोष लिखित पुस्तक विमेन अनलिमिटेड, नवी दिल्ली यांनी २००९ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या संदर्भात जागतिकीकरणानंतर स्त्रियांच्या कामाच्या स्वरूपात झालेल्या बदलांवर प्रस्तुत पुस्तक भाष्य करते.

प्रस्तावना

संपादन

१९९० नंतर वेगाने होत असलेल्या आर्थिक वाढीसाठी, भारतातील उत्पादक रोजगार संधींमध्ये तेवढ्या प्रमाणात वाढ करताना दिसत नाहीत, या विषयाची मांडणी या पुस्तकामधून केलेली आहे. एकीकडे कामातील सहभागाचे प्रमाण वाढताना दिसते मात्र स्त्रियांच्या अवैतनिक कामांमध्ये वाढ होताना दिसते. त्याचबरोबर कामासाठी स्थलांतर आणि खुली बेरोजगारी अशा प्रकारचे विरोधाभासी प्रवाह रोजगाराच्या स्वरूपात भारतामध्ये दिसून येतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा लेखिकेने आर्थिक प्रक्रिया आणि आर्थिक धोरणांशी संबंध जोडून यातील गुंतागुंत उघड करण्याचा प्रयत्त्‍न प्रस्तुत पुस्तकामधून केलेला आहे.

ठळक मुद्दे

संपादन

आर्थिक भांडवलावरील वर्चस्व, नव्या व्यापाराचा उदय आणि वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये विखुरलेल्या उत्पादन प्रक्रियांवर आधारलेला जागतिक उत्पादनाचा विस्तार, या सर्वांमुळे विकसनशील देशांमधील उत्पादक संरचना आणि कामगारांच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत. खुल्या बेरोजगारीच्या दरामध्ये वाढ होत आहे आणि औपचारिक किंवा संघटित क्षेत्रांतील रोजगार यामध्ये घट होत आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या विनावेतनाच्या कामातही वाढ होत आहे, असे या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संदर्भात केल्या गेलेल्या स्त्रियांच्या कामाविषयक मांडणीसंबंधात लिहिले आहे.

नंतरच्या प्रकरणांमध्ये लेखिकेने स्त्रियांच्या कामाच्या स्वरूपात झालेल्या वेगवेगळ्या बदलांचे परीक्षण केले आहे. स्त्रियांच्या वेतनामध्ये घट होत आहे त्याचबरोबर लिंगभावात्मक दरी वाढताना दिसते. जयती घोष यांच्या मते स्त्रियांचे उत्पादक काम बऱ्याचदा दुर्लक्षिले जाते. घरादाराच्या चौकटीत जी आर्थिक उलाढाल होते त्याचे मोजमाप केवळ किमान स्वरूपात केले जाते असे दिसते, त्याचप्रमाणे विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात एखाद्या कामात सहभागी होण्याचे जे प्रमाण आहे त्याचे मोजमापही योग्य प्रकारे होत नाही. त्याचबरोबर औपचारिक प्रभागामध्ये जो रोजगार उपलब्ध असतो तो 'कमावता पुरुष' ह्या प्रारूपावर आधारित असतो. हे प्रारूप स्त्रियांना पुरेसा अवकाश आणि स्वातंत्र्य देत नाही आणि त्याचबरोबर घरगुती जबाबदाऱ्यांमुळे स्त्रियांना या प्रकारच्या रोजगार निवडीवर मर्यादा येतात. याचाच परिणाम औपचारिक क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या वेतनावरही होताना दिसतो.

स्त्रियांच्या रोजगाराच्या संदर्भात सार्वजनिक रोजगार हा महत्त्वाचा पर्याय म्हणून बघितला जातो. कारण सरकारी क्षेत्रातून मिळणारा रोजगार, इतर सेवा सुविधा उदा० मातृत्वाची रजा इत्यादी फायदे मिळतात. त्यामुळे स्त्रियांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून सरकारी नोकरीकडे महत्त्वाचा पर्याय म्हणून बघितले जाते. परंतु सद्य परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारी नोकऱ्यांमधील कायमस्वरूपी रोजगाराचे प्रमाण कमी केले जात आहे. तर दुसरीकडे कंत्राटी स्वरूपाच्या कामांमध्ये वाढ होत आहे आणि या अशा स्वरूपातील कंत्राटी कामांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. या अशा स्वरूपाचीया रोजगाराविषयक मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे.

हाच मुद्दा जयती घोष यांनी 'आशा' (गावपातळीवर काम करणाऱ्या आरोग्य सेविका) याचा संदर्भ घेऊन अधिक विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे. यातून ेक महत्त्वाचा मुद्दा त्या मांडतात की, या स्वरूपाचे काम करणाऱ्या स्त्रियांकडे स्वयंसेविका म्हणून बघितले जाते, त्यामुळे त्यांना दिले जाणारे वेतन हे मानधनाच्या स्वरूपात दिले जाते. त्यांच्या कामाचे स्वरूप बघता त्यांना त्यातून मिळणारे वेतन हे अतिशय तुटपुंजे असते.

प्रस्तुत पुस्तकामध्ये जयती घोष यांनी स्वयंरोजगार करणाऱ्या कामगारांचेही परीक्षण केले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकी आणि बिगरशेती क्षेत्रांमध्ये स्वयंरोजगारामध्ये वाढ होत आहे. परंतु याप्रकारचे स्वयंरोजगार हे कमी उत्पादकता निर्माण करणारे आणि त्याचबरोबर खूप कमी मोबदला मिळवून देणारे असतात. त्यामुळे याप्रकारच्या स्वयंरोजगाराची शाश्वती नसते. याकडेही जयती घोष प्रस्तुत पुस्तकामधून लक्ष वेधतात.

या पुस्तकामध्ये जयती घोष यांनी स्त्रियांच्या विनावेतनाच्या कामाकडेही लक्ष वेधले आहे. स्त्रियांचा बराचसा वेळ विनावेतनाच्या कामामध्ये जातो. त्याचे हे काम उत्पादक काम म्हणून गणले जात नाही आणि जेव्हा स्त्रियांचा वेतनाच्या कामातील सहभाग वाढला तर घरातील विनावेतनाच्या कामाचा बोजा घरातील मुलींवर पडतो आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात. हा महत्त्वाचा मुद्द्यावर जयती घोष मांडणी करतात.

या पुस्तकामध्ये स्त्रियांच्या कामासाठी होत असणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतराविषयी मांडणी केलेली आहे. हालाखीची आर्थिक परिस्थिती, नव्या रोजगाराच्या संधी किंवा विशिष्ट कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट कौशल्यांचा अभाव या आणि अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांच्या कामासाठीच्या स्थलांतरामध्ये वाढ होत आहे. विशेषतः कमी वेतन असणाऱ्या कामामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. या प्रकारच्या स्थलांतरामुळे रोजगार मिळत आहे, उत्पन्न वाढत आहे असे सकारात्मक बदल घडत आहेत. परंतु असे जरी असले तरी नकारात्मक परिणामसुद्धा दिसून येतात; जसे की या प्रकारच्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जाते, स्त्रियांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. कारण या प्रकारच्या कामासाठी कोणत्याही प्रकारचे कायदे किंवा नियम अस्तित्वात नाहीत. याविषयक मांडणी या पुस्तकात केली आहे.

थोडक्यात, प्रस्तुत पुस्तकामध्ये जयती घोष यांनी जागतिकीकरणानंतर स्त्रियांच्या कामाच्या स्वरूपात झालेल्या बदलांचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणामधून येणाऱ्या माहितीच्या आधारे गुणात्मक विश्लेषण केले आहे. या पुस्तकामध्ये जयती घोष यांनी सध्याच्या आर्थिक वाढीवर चिकित्सक पद्धतीने टीका केलेली आहे. त्यांच्या मते सध्याच्या आर्थिक वाढीमुळे असमानता तीव्र होत आहे आणि तसेच स्त्रियांना या प्रक्रियेपासून वगळले जात आहे

प्रतिसाद किंवा योगदान

संपादन

'दोज हू डिड नॉट डाय'[] ह्या रंजना पधी लिखित पुस्तकामध्येही प्रस्तुत पुस्तकातील राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा संदर्भ हा कशाप्रकारे घरातील विनावेतनाच्या कामाचा बोजा घरातील मुलींवर पडतो आणि त्याचा परिणाम हा त्या मुलींच्या शिक्षणातील असणाऱ्या प्रमाणावर होतो या मुद्द्यासंदर्भात घेतला आहे.

शिकागो जर्नलमध्ये रंजिता बसू यांनी प्रस्तुत पुस्तकाची समीक्षा केलेली आहे. त्यांच्या मते स्त्रियांचा रोजगार आणि स्त्रियांचे सक्षमीकरण यांतील संबंध समजून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचे महत्त्वाचे योगदान आहे. स्त्रियांच्या रोजगारविषयक धोरणांमध्ये वृद्धी केल्याने आपोआपच स्त्रियांचे सक्षमीकरण या पारंपरिक ज्ञानाला आव्हान करणाऱ्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे.http://www.jstor.org/stable/pdf/10.1086/660184.pdf?acceptTC=true

महत्त्वाच्या संकल्पना

संपादन

जागतिकीकरण, घरदार, विकास, अवैतनिक काम, संघटित क्षेत्र, वगैरे.

संदर्भ सूची

संपादन
  1. ^ Ghosh, Jayati, Never Done and Poorly Paid, Women Unlimited, New Delhi, 2009.
  2. ^ Padhi,Ranjana,Those Who Did Not Die: Impact of the Agrarian Crisis on Women in Punjab, sage, 2012, pg no. 60