नितीन लवंगारे

(नितिन लवंगारे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. नितिन लवंगारे हे एक मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. लवंगारे यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भाग घेतला होता. ७-८ वर्षांनतर त्यांनी परत प्रॅक्टिस सुरू केली. त्या कालखंडात डॉक्टरी व्यवसायाचे बदललेले स्वरूप पाहून ते अस्वस्थ झाले. अशा मनःस्थितीत असताना त्यांनी हेन्‍री डेन्कर यांची ’एरर ऑफ जजमेन्ट’ ही कादंबरी वाचली. त्या कादंबरीत त्यांना भारतात रूढ होऊ पाहू लागलेल्या विकृत डॉक्टरी प्रवृत्तीची झाक दिसली. झपाटून जाऊन लवंगारे यांनी त्या कादंबरीला भारतीय पेहराव चढवून तिचे मराठी रूपांतर केले.

कादंबरीचे नाव ’निष्कर्ष’. पहिली आवृत्ती १९९५ साली निघाली. कादंबरी अतिशय खपते आहे हे पाहून, प्रकाशकाने डॉ. नितिन लवंगारे यांना न सांगता दुसरी आवृत्ती काढली. लवंगारे यांनी काही हालचाल करायच्या आत तो प्रकाशक दुसऱ्या एका गुन्ह्यासाठी तुरुंगात गेला. त्यानंतर पुण्याच्याच डायमंड प्रकाशनाने २०१०साली हे पुस्तक परत छापले. डॉ. श्रीराम लागू यांनी या कादंबरीवर चांगली दूरचित्रवाणी मालिका निघेल असे सुचविले. डॉ.जब्बार पटेल, राज काझी इत्यादींनी विचारणा केली, पण मालिका निघू शकली नाही. अखेर अभिनेते विक्रम गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली नितिन लवंगारे यांच्या ’निष्कर्ष’ या कादंबरीवर ’आघात’ नावाचा चित्रपट निघाला. पटकथा विजय तेंडुलकर यांची होती. विक्रम गोखले यांचे पहिलेच चित्रपट दिग्दर्शन होते. चित्रपटात त्यांची भूमिकाही होती. चित्रपट अतिशय गाजला. महाराष्ट्र सरकारचा १९८९सालचा वर्षातील सर्वोत्तम चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार ’आघात’ला मिळाला.