मोतिउर रहमान निझामी (पाबमा, बांगलादेश, ३१ मार्च, इ.स. १९४३; - ) हा बांगलादेशाच्या जमाते-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा वरिष्ठ नेता होता.

१९७१ साली पाकिस्तानशी लढून स्वातंत्र्य मिळवण्याला जमातचा विरोध होता. त्या स्वातंत्र्ययुद्धात बांगलादेशी नागरिकांवर अत्याचार करण्यात निझामीच्या निकटच्या साहाय्यकांनी ज्यावेळी पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती, त्यावेळी निझामी हा पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा, तसेच अल-बद्र या लोकसेनेचा प्रमुख होता. पाकिस्तानी लष्कराला साथ देऊन 'जमाते इस्लामी'च्या लोकांनी तीस लाख लोकांच्या शिरकाणात सक्रिय भाग घेतला होता.

१९७१ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात खून, बलात्कार आणि ज्येष्ठ बुद्धिजीवींचे खून घडवून आणणे अशा गुन्ह्यांसाठी निझामीला बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने (आयसीटी) २९ ऑक्टोबर २०१४ रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा ६ जानेवारी २०१६ रोजी कायम केली.

या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध निझामीने सुप्रीम कोर्टात केलेली पुनर्याचना फेटाळत, मुस्लिम बहुसंख्य बांगलादेशातील पहिले हिंदू सरन्यायाधीश न्या. सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या अपे‍लेट खंडपीठाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेनुसार निझामीला १० मे २०१६ रोजी फाशी देण्यात आले.