नाणकशास्त्र
नाणकशास्त्र हा एक स्वतंत्र विषय आहे. ज्याप्रमाणे इतिहास लिहिण्यांसाठी 'कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच नाण्याची सुद्धा आवश्यकता असते. गतकालीन घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी नाणेशास्त्राचा उपयोग होतो. पूर्वीच्या काळी राज्यारोहण, युद्धविजय अशा महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी नवी नाणी तयार केली बात. त्यावर काही शब्द किंवा प्रतिमा कोरलेल्या असत, त्यावरून त्या काळातील लिपी, तसेच धार्मिक संकल्पनाची माहिती मिळते. तसेच नाण्यासाठी वापरलेल्या धातूवरून उत्कालीन आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधता येतो. या दृष्टिकोणातून सम्राट अशोकाच्या काळातील नाण्याचा चिकित्सक अभ्यास डॉ. रोमीला थापर या विदुषीने केलेला आहे. अलीकडील काळात कागदी नोटा आल्यामुळे नाणी दुय्यम ठरली परंतु जेव्हा कागदी नोटा नव्हत्या तेव्हा नाणी अर्थव्यवस्थेचा एकमेव आधार होता. नाण्याच्या धातुवरून त्या राज्यातील आर्थिक परिस्थितीही समजत असे, तसेच त्या राज्याचा विचार व दृष्टिकोणही समजत असे. राज्याचा कालखंड ठरविणे हेही काम प्रामुख्याने होत असे. बऱ्याच वेळा त्या राज्याचा प्रदेशविस्तार किंवा व्यापारी संबंध ठरविण्यासाठी नाण्याची मदत होत असे. उदा. प्राचीन भारतीय नाणी रोममध्ये सापडली. यावरून प्राचीन भारतीयांचा व्यापार रोमशी होत होता है सिद्ध होते. भूमध्य समुद्रात तसेच इतरत्र अनेक ठिकाणी ग्रीकांची अनेक नाणी सापडली त्यावरून ग्रीकाचा राज्यविस्तार समजणे शक्य होते. नाण्यासाठी जो धातू वापरला असेल त्यावरून आर्थिक समृद्धता दिसून येते, उदा. सोन्याचे नाणे हे आर्थिक समृद्धता दाखवते तर ब्राँझचे नाणे हे आर्थिक व्यवस्था ढासळत आहे याचे द्योतक ठरते. ज्याप्रमाणे आर्थिक स्थिती समजते त्याप्रमाणे त्या राजाची मनोवृत्तीसुद्धा समजते. उदा. भारतीय नेपोलियन म्हणून ओळखला जाणारा समुद्रगुप्त याच्या नाण्यावर एका बाजूला तराजूचे चित्र व दुसऱ्या बाजूला वीणावादिनीचे चित्र कोरले आहे यावरून त्याचा न्यायीपणा व विद्येची आवड सिद्ध होते.
प्राचीन भारताने आपली मुद्रा व्यवस्था खूप पूर्वी निर्माण केली होती. वेदात निष्क, शतमान आणि सुवर्ण हे निश्चित वजन असणारे सोन्याचे तुकडे असावेत. यातील निष्क हे वैदिक काळातील सोन्याची मुद्रा होती जशी मनुस्मृतीच्या काळात होती. नाण्याची निर्मिती जर इ. स. पूर्व ७०० ते ६५० या काळात झालेली असली तरीही नाण्याचा शास्त्र म्हणून अभ्यास हा खूप उशिरा म्हणजे आधुनिक काळातच सुरू झाला. नाण्याशी संबंधित असणारे पहिले पुस्तक हे फ्रेंच भाषेत Guillaume Bude याने De Asseet Partibus या नावाचे १५१४ मध्ये लिहिले. असे असले तरीही नाण्यांचा पुरातत्त्वीय साधन या दृष्टीने अभ्यास हा विसाव्या शतकातच सुरू झाला.
नाण्यांचा शास्त्र म्हणून अभ्यास हा विसाव्या शतकात सुरू झालेला असला तरीही त्या अभ्यासाने इतिहासाचा पाया मजबूत करण्यास, त्यास सुस्पष्टता प्रदान करण्यास साह्यच केलेले आहे. आपल्या काळाच्या धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक इतिहासाचे प्रतिनिधित्व नाणी करीत असतात.[१]
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "संशोधन पद्धती आणि इतिहासाची साधने" (PDF). mu.ac.in (Marathi भाषेत). 10 November 2022. pp. 45–46. 10 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |