नाट्यवीर हे अजय वैद्य यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात मास्टर दत्ताराम वळवईकर यांच्या कारकिर्दीचा आढावा आहे.

पैशांपेक्षा नाट्यनिष्ठेला दिलेले महत्त्व, कलेवरील श्रद्धा, तळमळ, कठोर मेहनत घेण्याची तयारी असे दत्तारामांचे व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर आले आहेत. गोवा कला आणि संस्कृती संचालनालयाने या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्र सरकारला मास्टर दत्ताराम यांच्या कार्याचा विसर पडला असला, तरी गोवा सरकारने या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा योग्य तो गौरव केल्याचे बोलले जात आहे. आपल्या अंगभूत मर्यादांना अवाजवी महत्त्व न देता समोर कितीही दिग्गज नट असला तरीही आपले स्वतंत्र अस्तित्त्व नट कसा निर्माण करू शकतो आणि स्वतःचे स्थान निर्माण करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मास्टर दत्ताराम असे मानले जाते.

अंगकाठीने बारीक असूनही पौराणिक- ऐतिहासिक नाटकांमधील भीष्म, शिवाजी महाराज किंवा रामशास्त्री अशा प्रत्येक भूमिका त्यांनी मनापासून आणि सक्षमतेने केल्या. 'नाट्यवीर' या पुस्तकामध्ये दत्ताराम यांच्यावरील विद्याधर गोखले, मामा वरेरकर, मोहन वाघ यांच्या लेखांबरोबरच त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष ज्यांनी काम केले, त्या डॉ. वि.भा. देशपांडे, रामदास कामत, रामकृष्ण नायक, भिकूताई आंग्ले, मोहनदास सुखटणकर आदी ११ जणांच्या नवीन लेखांचाही समावेश करण्यात आला आहे.

एखाद्या नाटकाबद्दलची आत्मीयता, आपल्या भूमिकेबरोबर असलेला प्रामाणिकपणा, चोख अभिनय, योग्य शब्दोच्चार यांची मूर्तिमंत कार्यशाळा म्हणजे मास्टर दत्ताराम होत. नव्या पिढीला त्यांच्याबद्दल माहिती मिळावी यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली असून या पुस्तकात संपादक अजय वैद्य यांचा "शैलीदार अभिनय‘ नावाचा एक लेखही आहे.