धृतराष्ट्र

महाभारत महाकाव्यातील पात्र

धृतराष्ट्र हा अंबिकाविचित्रवीर्य यांचा नियोगाद्वारे जन्मलेला पुत्र होता. कुरू वंश टिकून राहावा यासाठी विचित्रविर्याच्या मृत्यूनंतर पुत्रप्राप्तीसाठी, अंबिका व अंबालिकेची सासू व राजमाता सत्यवतीच्या आदेशानुसार सत्यवतीचा कानिन पुत्र कृष्णद्वैपायन व्यास अर्थात्‌ व्यास पाराशर म्हणजेच महर्षी व्यास यांच्यामुळे अंबिकेला झालेला हा पुत्र होता. मात्र महर्षी व्यासांचे उग्र रूप पाहून तिने भितीने डोळे मिटून घेतले होते, यामुळे तिचा मुलगा धृतराष्ट्र आंधळा जन्मेल अशी भविष्यवाणी व्यासांनी केली होती.

धृतराष्ट्र व संजय

धृतराष्ट्र पांडुचा सावत्र भाऊ होता. तो शंभर कौरवांचा पिता होता. त्याच्या पत्नीचे व पट्टराणीचे नाव गांधारी होते. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव दुर्योधन होते. धृतराष्ट्र हा जन्मत:चा नेत्रहीन असल्याने त्याला हस्तिनापूरचे राज्य मिळू शकले नाही. त्याच्याऐवजी पांडूला हस्तिनापूरचा सम्राट करण्यात आले होते. पुढे शाप मिळाल्यामुळे विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासाला निघून गेला व सिंहासनावर बसण्याचा हक्क धृतराष्ट्राला आपोआपच प्राप्त झाला. मात्र काही वर्षांनंतर पंडूपुत्रांच्या म्हणजेच पांडवांच्या आगमनामुळे दुर्योधनाला हस्तिनापूरचा सम्राट बनविण्याचा हक्क डावलला जाऊ शकतो, हे लक्षात आल्यावर त्याने दुर्योधनाच्या पांडवविरोधातील सर्व कारवायांकडे दुर्लक्ष केले.

द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी त्याने आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचवण्यासाठी द्रौपदीला वरदाने देऊ केली होती, ज्यामुळे द्रौपदी आपल्या पांडवांना व आपल्या पुत्रांना दास्यत्वातून मुक्त करू शकली होती.

नेत्रहीन असूनही धृतराष्ट्राचे बाहूबल अचाट होते. भीमाने आपल्या सर्व पुत्रांना ठार केल्याचा प्रतिशोध घेता यावा, म्हणून महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्राने भिमाला आलिंगन देण्याच्या हेतूने आपल्या मिठीमधे ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र कृष्णाने चपळाईने भिमाऐवजी त्याच्या पुतळ्यास पुढे केले व धृतराष्ट्राने तो पुतळा मिठीत घेताच त्याचे तुकडे तुकडे झाले. कृष्णाच्या प्रसंगावधानामुळे धृतराष्ट्राच्या हातून घडू पाहणारी भिमाची हत्या टळली.

या प्रसंगानंतर त्याने आपली पत्नी गांधारी हिच्यासह वानप्रस्थाश्रम पत्करला.