द.वि. काणे
दत्तात्रय विष्णू काणे ऊर्फ काणेबुवा (जन्म : मार्च १९२९; - इचलकरंजी, १२ ऑक्टोबर १९९७ ) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक होते.
पार्श्वभूमी आणि शिक्षण
संपादनकाणेबुवांचे वडील संवादिनी, तबला, सतार ही वाद्ये वाजवत असत. इचलकरंजी येथील नारायणराव घोरपडे यांच्या राजदरबारात ते संवादिनी वादक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या घरातच संगीताचे वातावरण होते.पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं.काळेबुवा यांच्याकडे त्यांनी संगीताचे पहिले धडे घेतले. सातव्या-आठव्या वर्षापासूनच दत्तात्रय काणे किर्तनांना संवादिनीची साथ करू लागले.त्यांची संगीतातील प्रगती पाहून त्यांच्या वडिलांनी पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य असलेल्या पं.नीलकंठबुवा जंगम आणि पं.दत्तोपंत काळे यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले. पुढे इचलकरंजीचे जहागीरदार नारायणराव घोरपडे यांनी १९३० साली त्यांना पुण्याला पं.विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे पुढील संगीत शिक्षणासाठी पाठवले.
पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद,संगीतरत्न आणि अलंकार या परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं.यशवंतबुवा मिराशी यांच्याकडे सुद्धा त्यांनी संगीत शिक्षण घेतले. १९४८ साली आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद विलायत हुसेन खॉं यांच्याकडे त्यांनी रीतसर गंडा बांधून शिक्षण घेतले.
ग्वाल्हेर घराणे आणि आग्रा घराण्यांच्या गायकी बरोबरच जयपूर आणि किराणा घराण्यांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता.त्यातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. ते नाट्यगीते आणि भजनेसुद्धा उत्तम सादर करत असत.[१] इचलकरंजीतील सुप्रसिद्ध गायक पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी १९६७ मध्ये पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ स्थापन केले.
शिष्य
संपादनकाणे बुवांनी अनेक शिष्य तयार केले. त्यात रघूबुवा काळे, पं. नरेंद्र कणेकर, पं. बाळासाहेब टिकेकर, शिवानंद पाटील, सुखदा काणे, वर्षा भावे, गिरीश कुलकर्णी, मंगला जोशी, शरद जांभेकर,मधुसूदन आपटे,उषा रानडे,हृषीकेश बोडस, मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचा समावेश आहे.
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- गांधर्व महाविद्यालयाने काणेबुवांना संगीताचार्य ही सर्वोच्च पदवी देऊन गौरवले.
- इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनने त्यांचा गौरव केला.
- काणे कुलप्रतिष्ठानाने भारतरत्न महामहोपाध्याय पां.वा.काणे पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
स्मारक
संपादनकाणेबुवांच्या शिष्या मंजुषा कुलकर्णी-पाटील यांनी त्यांच्या स्मरणार्थ सांगली येथे संगीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानतर्फे पूर्णवेळ संगीत शिक्षणासाठी गुरुकुल चालते. तसेच संगीत मैफली, संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्या, ज्येष्ठ गायकांचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. [२]