दीपदर्शन
आपल्या हिंदू पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिले आहे त्याच्यामागे खूप सखोल जाणीव आणि कृतज्ञतेची भावना साठवलेली आहे. विद्युतशक्तीच्या ह्या युगातही तुपाचा/तेलाचा दिवाचा पेटवून त्याला नमस्कार करण्याचा प्रघात आहे. तुपाचा दिवा स्वतःच्या मंदमंद जळणाऱ्या ज्योतीने मानवाला आत्मज्योतीची कल्पना देतो आणि अशा रितीने त्याला शांत बनवून अंतर्मुख करतो.
एक तुपाचा दिवा हजारो दिवे पेटवू शकतो परंतु विजेचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही. माणसाने दिव्यापासून ही प्रेरणा घेण्यासारखी आहे की मी प्रकाशित होईन आणि इतरांनांही प्रकाशित करीन. स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा दिवा आपल्याला देतो. माणसानेही जगातील अंधार हटविण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे, अशी जीवनदीक्षा दीपक आपल्याला देतो. सतत तेवत्या दिव्याच्या पाठीमागे माणसाने प्रभुकार्यासाठी, मानव्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे अशी सूचना आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रकाश पसरवून सतत तेवता दिवा आपल्याला देवाच्या मूर्तीचे दर्शन करवितो त्याचप्रमाणे जगातल्या अंधारात लोकांना ईश्वराभिमुख करण्यासाठी समजदार माणसाने अखंड जळत राहिले पाहिजे.
आषाढ अमावास्या ही दिव्याची अमावास्या या दिवशी घरातले सर्व तांब्या-पितळेचे आणि चांदीचे दिवे पेटवून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजरीच्या पिठाचे उकडलेले पणतीच्या आकाराचे दिवे [१] जेवताना गुळाबरोबर खातात.