कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा किंवा कलिंग शैलीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोणार्कचे सूर्य मंदिर होय.दुर्दैवाने आता या मंदिराची पडझड झालेली आहे.केवळ जगमोहन सभामंडप सोडले तर इतर कोणताच भाग सुस्थितीत नाही. काही विद्वानांच्या मते हे मंदिर पूर्ण बांधून झाले नसावे.कलिंग देशातील गंग वंशातील राजा नरसिंह देव आणि राणी सीता देवी यांनी हे मंदिर बांधले.हे मंदिर तेराव्या शतकात बांधले गेले आहे.

   कोणार्कचे सूर्यमंदिर 250 मीटर लांब व 162 मीटर रुंद असून त्याचा विस्तार प्रचंड आहे. सबंध मंदिर साडेतीन मीटर उंचीच्या पिठावर बांधलेले आहे.याच चौथऱ्यावर मुख्य मंदिराच्या तीन बाजूला पूर्वी तीन सूर्य मंदिरे होती. मंदिरासमोर नाट्यमंदिर होते.मंदिराच्या प्रांगणात अग्नि शाळेची वास्तू होती.तसेच मंदिराच्या चारही दिशेला गोपुरे होती.  गोपुरापासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या व मानवांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत.