थर्मोपिलाईचे युद्ध
ग्रीक-पर्शियन युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक इ.स.पू. ४८०
स्थान थर्मोपिलाई ग्रीस
परिणती पर्शियन विजय परंतु प्रचंड नुकसान
युद्धमान पक्ष
ग्रीक शहरे पर्शियन साम्राज्य
सेनापती
लिओनिदास
थेमिस्टीक्लिस
झर्कसिज
सैन्यबळ
३०० स्पार्टा
७०० थेस्पीयन
६००० अथेन्स
२ ते २.५ लाख
बळी आणि नुकसान
२९९ स्पार्टाचे सैनिक ७०० थेस्पीयन सैनिक अंदाजे २००००

पर्शियाग्रीस मध्ये इ.स.पू. ४२८ मध्ये झालेल्या युद्धाला थर्मोपिलाईचे युद्ध म्हणतात. हे युद्ध पर्शियन लोकांनी जरी जिंकले तरी ग्रीकांनी पर्शियाच्या मोठ्या सैन्याचा मोठ्या धैर्याने सामना केला. पर्शियन सैन्याला केवळ ३०० स्पार्टाच्या सैनिकांच्या तुकडी कडून प्रंचड नुकसान सहन करावे लागले. ज्याचा फायदा ग्रीकांनी पुढील युद्धामध्ये घेतला व सरतेशेवटी ग्रीकांनी आरमारामधील युद्धात पर्शियन सैन्याला पराभूत केले.

हे युद्ध स्पार्टाच्या ३०० सैनिकांसाठी ओळखले जाते. आपले मरण निश्चित असताना त्यांनी केलेले बलिदान आजही केवळ ग्रीकच नव्हे तर जगातील सर्व योद्धयांना, स्वातंत्र्यप्रेमींना व राष्ट्रवाद्यांना प्रेरित करते.

प्राचीन ग्रीसमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती.

अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. "

झेरेक्सिसचे खरे शत्रू होते अथेन्स आणि स्पार्टा. अथेन्सवर स्वारी करायची झाली तर त्याच्या भूमार्गावरील सैन्याला दक्षिणेकडे अथेन्स गाठण्यासाठी थर्मापलैची अरुंद वाट पार करून येणे क्रमप्राप्त होते. डोंगरातून जाणाऱ्या या अरुंद वाटेच्या एका बाजूस समुद्र होता तर दुसऱ्या बाजूस कपारी. ही वाट इतकी अरुंद होती की एकावेळेस एक रथ कसाबसा जाऊ शके. पर्शियन सैन्याला खिंडीत गाठण्यास यापेक्षा बरी जागा मिळाली नसती. सुमारे २ लाखांचे सैन्य घेऊन झेरेक्सिस येत होता. स्पार्टाचा राजा लिओनायडसच्या नेतृत्वाखाली पर्शियन सेनेवर हल्ला करण्याचे मित्र ग्रीक सेनेने ठरवले. परंतु स्पार्टाचे मुख्य सैन्य आर्टेमिसियमच्या सामुद्रधुनीत गुंतले होते. लिओनायडसने त्याचे ३०० शूर अंगरक्षक आणि स्पार्टातील दुय्यम सेना, ज्यांत हेलॉटसही सामील होते यांच्यासह थर्मापलैकडे कूच केले. वाटेत त्यांना इतर सैन्येही मिळत गेली परंतु त्यांची एकूण संख्या ५-७ हजारांच्या घरात होती.

पर्शियाच्या प्रचंड सेनेसमोर लिओनायडसच्या लहानशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्य होते. तरीही तीन दिवस प्राणांची बाजी लढवत ग्रीक सैन्य लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेला सळो की पळो करून सोडले. तिसऱ्या दिवशी फितुरी होऊन पर्शियन सैन्याला डोंगरातून ग्रीक सेनेला गाठण्याचा दुसरा मार्ग दाखवला गेला आणि ग्रीक सेना पुढून आणि मागून पर्शियन सेनेच्या तावडीत सापडली. लिओनायडसला आपला पराभव दिसू लागल्यावर त्याने इतर ग्रीक राज्यांच्या सेनेला परतायचा हुकूम दिला. त्याच्या हुकुमानुसार इतर ग्रीक सेना माघारी फिरली. लिओनायडस स्वतः मात्र त्याच्या तीनशे अंगरक्षकांसह पर्शियन सैन्याला तोंड देण्यास मागे राहिला. यानंतरची कहाणी लिओनायडसच्या आणि त्याच्या तीनशे वीरांच्या अतुलनीय कामगिरीची आहे.

पहाटे देवतांना अर्ध्य वाहून लिओनायडस आणि त्याचे तीनशे वीर लाखोंच्या पर्शियन सैन्याला सरळ सामोरे गेले. वाटेत येणाऱ्या एकेकाला कापून काढत, प्रत्येक वीर त्याच्या हातातील भाल्याचे तुकडे होईपर्यंत लढला. भाल्यांचे झालेले तुकडे घेऊनही ते पर्शियन सैन्यावर वार करत राहिले. लढाईत लिओनायडसचा मृत्यू झाला हे कळून आले तरी ते ३०० वीर मागे फिरले नाहीत. त्याच्या मृत शरीराला तुडवत लढाई सुरूच राहीली. शेवटी पर्शियन सैन्याने बाणांचा वर्षाव करून सर्वांना कंठस्नान घातले. एकही वीर मागे उरला नाही. संतप्त झेरेक्सिसने लिओनायडसच्या मृत शरीराचे मुंडके कापून धड क्रूसावर चढवले आणि विजय साजरा केला. या लढाईनंतर आर्टेमिसियमलाही ग्रीकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आणि त्यांनी माघार घेतली.

येथून पर्शियन सेना अथेन्सवर चालून गेली परंतु लिओनायडसच्या तीनशे वीरांनी पर्शियन सेनेचा मार्ग आठवड्याभरापेक्षा जास्त रोखून धरल्याने अथेन्सवासियांना शहर रिकामे करण्याची संधी मिळाली. झेरेक्सिसने अथेन्सला आग लावून बेचिराख केले पण नगरवासीयांचे प्राण लिओनायडसच्या पराक्रमाने वाचले. लिओनायडसच्या पराक्रमामुळे नंतर झालेल्या सलामिस येथील युद्धात मित्र-ग्रीक सैन्य निकराने लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेवर विजय मिळवला.

पाश्चात्य इतिहासात या कथेला फार मोठे महत्त्व आहे. या कथेवरून साहित्यात काव्य, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे. “तीनशेंची लढाई" (battle of 300) या नावाने हे युद्ध अनेक वर्षे सर्वांना प्रेरणा देत आले आहे. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही या लढाईवर एक पाठ अवश्य दिसतो. प्रत्यक्षात २ लाखांच्या सेनेसमोर स्पार्टाच्या राजाने आपले प्राणार्पण करण्यात फार मोठे डावपेच दिसत नाहीत. या तीनशेंसह मागे राहिलेल्या सुमारे १००० हेलॉटांचा आणि थेस्पियन सैन्याचा उल्लेखही सहसा दिसत नाही. या लढाईत पर्शियन सैन्याचा मार्ग रोखून धरल्याने सलामिस येथे सैन्याची जमवाजमव करण्याची संधी मिळाली असाही गैरसमज अनेकांचा दिसतो. त्यात फारसे तथ्य नाही. स्पार्टाच्या राजाने अशाप्रकारे मागचा-पुढचा विचार न करता किंवा दुसरी युद्धनीती न आखता शत्रूवर सरळ चाल करणे कितपत शहाणपणाचे होते हे सांगता येत नाही. येथे या वीरांचे स्पार्टात मिळालेले खडतर प्रशिक्षण आड आले किंवा डेल्फायच्या भविष्यकर्तीवर असलेला अवास्तव विश्वास लिओनायडला असा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरला असे सांगितले जाते. परंतु, लिओनायडसचे प्राणार्पण शत्रूसमोर माघार न घेता त्वेषाने लढण्यास अनेकांना पुढे प्रेरणादायी ठरले हे खरेच.