त्र्यंबक शिवराम भारदे

त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे (जन्म : २५ मे १९१४; - २२ नोव्हेंबर २००६) हे मराठी राजकारणी, गांधीवादी नेते होते.

बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री होते. ते त्यानंतर ते आधी विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.

भारदे कुटुंब मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे. बाळासाहेबांचे वडील शिवरामपंत भारदे यांचा एक प्रकांड पंडित म्हणून परिसरात दबदबा होता. पुस्तक

बाळासाहेब भारदे यांची पत्रकारिता

संपादन

अहमदनगर जिल्हा कॉग्रेस पक्षाने १९३६मध्ये सत्याग्रहाची चळवळ जनसामान्यांपर्यत नेण्यासाठी ‘संघशक्ती’ हे साप्ताहिक सुरू केले होते. सामांन्य जनतेची गाऱ्हाणी संघशक्तीतून अग्रक्रमाने मांडली जात. संघशक्तीच्या संपादकत्वाची जबाबदारी चले जाव चळवळीतले सेनानी रावसाहेब पटवर्धन तसेच भाऊसाहेब फिरोदिया यांच्यावर होती. १९४८ च्या सुमारास रावसाहेब पटवर्धन नगर सोडून पुण्याला गेले. त्यामुळं काही काळ संघशक्ती बंद पडले. मात्र रावसाहेबांचे राजकीय शिष्य त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे यांनी संघशक्तीच पुनरुज्जीवन केले. बाळासाहेबांनी आपल्या लोकाभिमुखतेचा व विद्वत्ततापूर्ण विचारांचा ठसा आपल्या संपादनाद्वारे आणि लेखनाद्वारे संघशक्तीवर उमटविला. त्यामुळे संघशक्तीचे नाव महाराष्ट्रात सर्वदूर पसरले.

या काळात अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेत सक्रिय असलेल्या बाळासाहेब भारदे यांच्या पुढाकाराने १९४७मध्ये नगर जिल्हा मराठी पत्रकार संघ ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू झाली.1 951 मध्ये बाळासाहेब भारदे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच नगरला मराठी पत्रकार परिषदेचे अकरावे अधिवेशन झाले. धुळ्याच्या स्वतंत्र भारतचे संपादक अ.वि.टिळक हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मावळते अध्यक्ष आचार्य प्र.के.अत्रे देखील अधिवे़शनास उपस्थित होते. बाळासाहेब भारदे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. दोन वर्षांनी मुंबईत झालेल्या तेराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद बाळासाहेब भारदेंना मिळाले. ह.रा. महाजनी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर बाळासाहेब भारदेंची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. १९५३मध्ये झालेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आप्पा पेेडसे होते.

बाळासाहेब भारदे यांची विधानसभेतील कारकीर्द

संपादन

मुंबईच्या अधिवेशनानंतर मात्र बाळासाहेबांचा पत्रकारितेशी फारसा संबंध राहिला नाही. कारण ते राजकाऱणात कमालीचे व्यस्त झाले. आधी आमदार आणि १९५७मध्ये महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री झाले. पहिल्यांदा १९६२ व पुन्हा १९६७ असे दोन वेळा आणि सलग दहा वर्षे ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष निवडले गेले.

बाळासाहेब यांचे गांधीवादी वर्तन

संपादन

सहकार मंत्री झाल्याची बातमी भारदेंनी रेडिओवर ऐकली आणि नंतर ते एस.टी.ने तिकीट काढून मुंबईला गेले. हा साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला आणि समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला. त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी गांधीच्या विचारधारेवरच समाजकारण आणि राजकारण केले. त्यांनी जाती-धर्माच्या संस्था आणि संघटनांना कायम दूर ठेवले. त्यांनी उच्च पदांवर काम करताना अनेक चांगले पायंडे पाडले आणि अध्यक्ष म्हणून अपेक्षित असलेला निःपक्षपणा आपल्या निर्णयांतून दाखवून दिला. उच्च नीतिमूल्याचे आचरण करीत त्यांनी अध्यक्षपदाचे पावित्र्यही जतन केले. भारदे बुवांनी महाराष्ट्राला न संपणारे विचारधन तर दिलेच त्याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण योजनाही त्यांनी महाराष्ट्राला दिल्या.

वक्तृत्व, विद्वत्ता आणि साधेपणा

संपादन

अर्थपूर्ण शाब्दिक कोट्या, मर्मभेदी विवेचन, विनोदी शैली ही त्यांच्या वक्तृत्वाची काही अंगे सांगता येतील. धोतर,सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेले भारदे बुवा राजकारणातील संत म्हणूनच ओळखले जायचे. राजकारण, अध्यात्म, समाजकारणकिंवा सहकार आणि पत्रकारिता या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटविला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. मूलतःच तल्लखबुद्धी असलेले भारदे आपल्या विद्वत्तेच्या तेजाने आयुष्यभर तळपत राहिले.

राजकारणात मुरल्यावर बाळासाहेब भारदे यांनी पत्रकारिता सोडली पण कीर्तने करणे सोडले नाही.

बाळासाहेब भारदे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • कृषिक्रांती : दोन पैलू

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • पद्मभूषण (सन २००१)
  • भारदे यांच्या नावाने 'देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार' दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार जालन्याचे कृषिरत्न जलतज्ज्ञ विजयअाण्णा बोराडे, भोपाळच्या भारतीय कृषी संशोधन केंद्राचे गांधीवादी वैज्ञानिक डॉ. मधाब चंद्र मन्ना आणि समाज प्रबोधन करणारे पढरपूरचे ह.भ.प. रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांना प्रदान झाला.
  • २०१६ साली या पुरस्कारांनी डॉ. सुभाष पुरी, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे आणि अनिकेत आमटे (गांधीविचार कार्य) यांना सन्मानित करण्यात आले.
  • बाळासाहेबांच्या नावाचे 'पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठान' व 'लोकाग्रणी बाळासाहेब विचारमंच' आहेत. प्रतिष्ठानातर्फे वैचारिकविषयावर परिसंवाद होतात.
  • मोहन भारदे यांनी भारदे यांचे 'बाळासाहेब भारदे' नावाचे चरित्र लिहिले आहे.