त्रिंबक नारायण आत्रे

त्रिंबक नारायण आत्रे (जन्म : ५ सप्टेंबर १८७२; - फेब्रुवारी १९३३) हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक होते. मुंबई विद्यापीठातून आत्र्यांनी पदवी घेतली व नंतर त्यांनी मुंबई सरकारच्या महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून नोकरीस प्रारंभ केला. पुढे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामांवर खास अंमलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली, आणि शेवटी सबसज्ज म्हणून ते निवृत्त झाले..

आपल्या कामाचा व्याप सांभाळून आत्र्यांनी लिखाण केले. त्यांचे 'गुन्हेगारी जाती' हे गाजलेले पुस्तक एम केनेडी यांच्या 'क्रिमिनल क्लासेस इन द प्रेसिडेन्सी ' यावर आधारित असून त्यात वंजारे, भामटे, कैकाडी, मांग - गारुडी, रामोशी या तत्कालीन गुन्हेगार जमाती, त्यांच्या भाषा, त्यांच्या चालीरिती, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, वेशभूषा, सांकेतिक चिन्हे या बद्दलची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

मुलकी खात्यात नोकरीला असल्याने आत्र्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचे जवळून व बारकाईने निरीक्षण केले, त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला. प्रामुख्या[]ने शेतकरी आणि शेतीचे अर्थशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे. 'गावगाडा'मध्ये त्या काळची विशिष्ट लहेजा असलेली भाषा आहे. त्या काळाच्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांतून मराठी ग्रामसंस्कृतीचा विविधांगी परिचय करून दिला आहे. ह्या पुस्तकाने मराठी सामाजिक शास्त्रीय वाड्मयात मोलाची भर घातली आहे.

काळी, पांढरी, खेडे, मौजे, कसबा पेठ. कुणबी इ. विषयांबद्दलची माहिती या पुस्तकात आली आहे.

सन १९३३मध्ये मधुमेहाच्या विकाराने त्रिंबक नारायण आत्रे यांचे निधन झाले.

  1. ^ गोखले, अरविंद (जून २०१८). "गावगाडा (शताब्दी आवृती)". राजहंस ग्रंथवेध. मे २०१६: ३७-३९.