तेज (वृत्तपत्र)
तेज हे ९ मे १९३१ रोजी मुंबई येथे सुरू झालेले मराठी भाषेतील साप्ताहिक होते. दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेल्या ब्राम्हणेतर वृत्तपत्रांपैकी ते एक होते. कैवारी बंद पडल्यानंतर दिनकरराव जवळकरांनी कोणत्याही सल्लागार मंडळाचा हस्तक्षेप न ठेवता हे साप्ताहिक सुरू केले. तेजमध्ये राजकीय घडामोडींच्या बातम्या असून, शेतकऱ्यांची व कामगारांची बाजू मांडली जात असे. 'जेज'मध्ये तत्कालीन संस्थानिकांच्या कारभारावर प्रकाश पाडून गरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लिखाण केले गेले.
तेज | |
---|---|
प्रकार | साप्ताहिक |
मुख्य संपादक | दिनकरराव जवळकरा |
स्थापना | १९३१ |
भाषा | मराठी |
प्रकाशन बंद | १९३२ |
मुख्यालय | महाराष्ट्र, भारत |
इतिहास
संपादनहे साप्ताहिक जेमतेम चार ते पाच महिने चालले आणि बंद पडले. दिनकरराव जवळकरांना रक्तक्षयाचा आजार झाला होता. त्यांना डॉक्टरांनी लिहिण्या बोलण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे तेजच्या छपाईत खंड पडून ते बंद झाले व त्यानंतर अवघ्या सहा-सात महिन्यानंतर ३ मे १९३२ रोजी दिनकरराव जवळकरांचे निधन झाले.
कैवारीच्या तुलनेत तेजमध्ये जाहिरातींचे प्रमाण कमी होते. तरीही अनेक उत्पादनांच्या व्यावसायिक जाहिराती असत. तेजमध्ये शेतकऱ्यांच्या हितसंबंधाच्या चर्चेला जास्त प्राधान्य दिले गेले. तेजमध्ये मुंबई प्रांतात विविध ठिकाणी भरलेल्या शेतकरी परिषदांची वृत्ते दिली गेली आहेत.
रचना व स्वरूप
संपादनतेज पत्रावर इंग्रजीत ‘The Tej –Organ of the Maharashtra Peasants’ असा मजकूर असे. एकूण आठ पानांचे हे साप्ताहिक होते. तेजमधील मजकूर सामान्यतः राष्ट्रीय धोरण चळवळीला धरून होते. या वृत्तपत्रापासून दिनकरराव जवळकरांच्या वृत्तपत्रीय सृष्टीचे स्वरूप, ध्येयधोरणे पूर्ण बदलली होती. तेजमधील आशय राष्ट्रवादाकडे, समाजवादाकडे झुकला होता. पत्रात स्फुटविचार, पोंच व अभिप्राय, संपादकीय लेख, लंडनचे बातमीपत्र, संपूर्ण गोष्टी अशी सदरे होती.