तुकाराम मुंढे
तुकाराम हरिभाऊ मुंढे (३ जून, १९७५:ताडसोना, बीड, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील २००५ सालचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
तुकाराम मुंढे | |
---|---|
जन्म |
३ जून, १९७५ ताडसोना, बीड, महाराष्ट्र |
निवासस्थान | नागपूर |
मूळ गाव | ताडसोना |
पदवी हुद्दा | जिल्हाधिकारी |
धर्म | हिंदू |
मुंढे आणि त्यांच्या भावाने जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते.[१] त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र विषय घेऊन त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परीक्षेत प्रावीण्य मिळवले व त्यांना दुसऱ्या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया संपेपर्यंत त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.
पद कारभार
संपादनमे २००५ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. ते देशात २० वे आले होते. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली; तिथून त्यांची बदली नांदेडला साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली, त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. तेव्हा त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहिल्यांदाच 'सीईओ'ने डाॅक्टरला निलंबित केले होते.
२००९ सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे २०१०मध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व ग्रमोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले. जिथे जात तिथे ते आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केले.
पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे पद सांभाळले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापुरातील २८२ गावे घेतली. या गावांतील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रुपयांमध्ये केली. यात लोकांचे योगदान ५०-६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 'सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोलापूरमध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोक यावेळी वारीला हजेरी लावतात, त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात, त्यातून नदी प्रदूषित होते. परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी असताना अवघ्या २१ दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी त्यांनी ३ हजार शौचालयाची व्यवस्था केली. त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर व्ही.आय.पी. दर्शन त्यांनी बंद केले.
सप्टेंबर २०१२ साली त्याची बदली मुंबईला, विक्री व कर विभागाच्या सहआयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात १४३ कोटी रुपयांचा महसूल ५०० कोटीवर गेला.
नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘‘आयुक्तासोबत चला ’‘ (Walk With Commissioner) हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबईमधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला. त्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा, पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.
पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक होते. दर महिन्याला पीएमपीएमएलची ६ लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या ९ लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम ई -टिकिटिंग बससेवा म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस (Automatic Fare Collection System) यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केव्हाही या टिकिटिंग यंत्रणेचे नियंत्रण आणि निरीक्षण करू शकतात. त्यामुळे बससेवेच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्केवरून शंभर टक्के अशी वाढ फक्त तीन महिन्यात झाली.
नंतर २०१८मध्ये त्यांच्या नाशिकमधील चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. नाशिकच्या नागरिकांनी सातत्याने मुंढे यांना पाठिंबा दिला, पण तेथूनही त्यांची बदली झाली.
संदर्भ
संपादन- ^ "Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र". biographymarathi.com. 2021-03-18 रोजी पाहिले.