तांडा

तांडा म्हणजे ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जोपासणाऱ्या बंजारा समाजाची लोक वसाहत होय
(तांडा संस्कृती या पानावरून पुनर्निर्देशित)

तांडा हा बंजारा भाषिकांचा एक स्वतंत्र लोकसमुह असतो. जेथे बंजारा समाजाचे लोक राहतात त्याला "तांडा" म्हणतात. गौर बंजारा संस्कृतीचा दर्पण म्हणून तांडा ओळखला जातो. तांडा व्यवस्थेचे अभ्यासक , प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार-नायक यांच्या मते , "तांडा म्हणजे प्राकृतिक सृजनतेला , मानवी मूल्याला गती, निरंतरता प्रदान करणारी आणि संरक्षित करणारी एक स्वतंत्र आदिम व्यवस्था होय." तांडा म्हणजे ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जोपासणाऱ्या बंजारा समाजाची लोक वसाहत आहे, अशा विविध व्याख्या तांडा बाबत दिसून येते. बंजारा साहित्य मध्ये तांड्याबाबत विपुल लेखन दिसून येते. तांडयाच्या प्रमुखाला नाईक (नायक) असे म्हणतात. तर त्यांच्या सोबतीला कारभारी, हासाबी, नसाबी व डायसांळ असे प्रमुख गणमान्य व्यक्ती असतात. तांड्याची समृद्ध अशी स्वतंत्र व्यवस्था असून प्रकृतीपुजक , मानवतावादी आणि विवेकवादावर अधिक भर असल्याने आजही तांडयात हजारो वर्षांपासून सुरू असलेली वैश्विक कल्याणाची 'सेनं सायी वेस' ही सामुदायिक आराधना केली जाते. तांडा बहुतांशी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. तांडयात गोर बंजारा भाषा बोलली जाते. ब्रिटीशाच्या विरोधी धोरणामुळे वैभवशाली बंजारा व्यवस्था कोलमडून पडली होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कृषीक्रांतीचे प्रणेते व थोर समाजसुधारक महानायक वसंतराव नाईक यांच्या परिश्रमाने तांडा स्थिरावल्याचे दिसून येते. पूर्वी बंजारा समाजाचा व्यापार हा फक्त भारतभर नव्हता , तर युरोपियन देशापर्यंत चालत असे. त्यामुळे बंजारा समाजाला भारतातील पहिले व्यापारी म्हणूनही ओळखले जात असे. महान योद्धा व जगातील सर्वात मोठा "लोहगड" किल्ला उभारणारे शूरवीर, तसेच आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून ओळख असलेले बाबा लखीशाह बंजारा यांचा जगभर आजही उल्लेख होतो. शाह यांचा अर्थ 'राजा' असा होतो. लखीराय यांचे दिल्लीस्थित मालचा, रकाबगंज, बारखंबा, रायसिना हे अतिशय समृद्ध तांडा वसाहती त्यांच्या अधिपत्याखाली होते. आज जरी तांड्याला गावाच्या नावाने ओळखले जाते, परंतु त्यांची खरी ओळख बंजारा संस्कृतीत तांडा म्हणूनच होते.(उदा. गहुली तांडा, कुंटुर तांडा, बारड तांडा, वरोली तांडा, मांडवी तांडा ई.) तर पूर्वी मात्र नायकाच्या नावाने ओळखले जायचे (उदा. भिमा नायकेर तांडो, लाखा रायरो तांडो, फुलसिंग बापूर तांडो, रामजी नायकेर तांडो). तांडा म्हणजे बंजारा गोरमाटीचा गड-किल्ला मानला जाते. तांडयाला 'गड' म्हणूनही संबोधले जाते. उदा. गहुलीगड, गडमंगरूळ, सेवागड, उमरीगड, रूईगड, लाखागड, पोहरागड, वसंतगड.[][]

तांडा आणि गाव यातील वेगळेपण

संपादन

तांडा आणि प्रस्थापित गाव खेडी यात फार मोठे वेगळेपण आहे. याचे कारण म्हणजे तांडा फक्त बंजारा समाज, साहित्य व संस्कृती जोपासणाऱ्या लोकसमुदायाची वसाहत असते. तांडयाची स्वतंत्र संस्कृती , स्वतंत्र पेहराव, आभूषणे, सणोत्सव व स्वतंत्र भाषा, स्वतंत्र व्यवस्था आहे. तर गावात मात्र विविध समुदायाचे विविध संस्कृती जोपासणाऱ्या लोकांची वसाहत असते. तांडयाने आजच्या आधुनिक काळातही आपली स्वतंत्र संस्कृती जोपासल्याचे दिसून येते. तांडयात आजही वैश्विक कल्याणाची सेनं सायी वेस ही आराधना केली जाते. बहुतांश तांडा हा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला असतो. तांडयात बंजारा भाषा बोलली जाते. त्यास गोरमाटी असेही म्हणतात. बंजारा समाज बांधव एकमेकांशी गोरमाटी म्हणूनच ओळख देतात. या स्वतंत्र तांडा व्यवस्थेच्या सक्षमीकरण व ग्लोबलायझेशनसाठी 'तांडेसामू चालो' हा तांडावादी विचार रूजला गेला.

तांडेसामू चालो

संपादन
मुख्य लेख: तांडेसामू चालो

'तांडेसामू चालो' म्हणजे 'तांडयाकडे चला' असा मराठीत शब्दशः अर्थ होतो. परंतु 'तांडेसामू चालो' ही अतिशय व्यापक आणि स्वतंत्र अशी संकल्पना आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींजीनी गाव खेडयांच्या स्वयंपूर्णतेसाठी खेडयाकडे चला अशी नवी संकल्पना आणली. परिणामी गाव खेडी मोठ्या प्रमाणात प्रवाहात आली. पायाभूत सुविधानी संपन्न होउ लागली. परंतु या तुलनेत तांडा मात्र कुठेच नाही. शिवाय या संकल्पनेला तांडा मात्र स्पर्शल्याही गेला नाही. तांडयाचे प्रश्न, तांडयाची संस्कृती व तांडयाचे लोकेशन मात्र गावा पेक्षा अतिशय भिन्न आहे. तांडा आजच्या आधुनिक काळातही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. तांडयाच्या शाश्वत विकासासाठी प्रख्यात विचारवंत व तांडा प्रवर्तक एकनाथ पवार नायक यांनी तांडेसामू चालो ही अभिनव संकल्पना पहिल्यांदा रुजवली. व तांडयाच्या शाश्वत विकासासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व समाजातील उच्च वर्गियांना 'तांडेसामू चालो' म्हणून हाक देत तांडयाचे प्रश्न, व्यथा वेदनाकडे लक्ष वेधले. "तांडा संविधानाच्या कलमाने साक्षर व्हावा. शिवाय स्मार्ट आणि ग्लोबल व्हावा. तांडयातील जुनाट कालबाह्य विचार मुळासकट फेकुन तिथे सर्जनशीलतेची , उदयमशिलतेची आणि संविधानिक मूल्यांची नवपेरणी व्हावी. " असे सर्जनशील विचार तांडा प्रवर्तक एकनाथ पवार (नायक)यांनी पेरण्यास सुरुवात केली स्मार्ट तांडा व ग्लोबल तांडा हे अभिनव व्हिजनही त्यांनी प्रथमच आपल्या तांडावादी विचारातून पुढे आणली. तांडयाचे नागरीकरण होण्याचे स्वप्न या संकल्पनेच्या मुळाशी रुजलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे तांडयाशी जुळलेली जन्माची नाळ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही अबाधित रहावी, यासाठी 'तांडेसामू चालो' हे तांडावादी विचार प्रेरक ठरणारे आहे.

तांडयाचे वैशिष्ट्ये

संपादन

तांडा हा वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यानी संपन्न आहे. तांडयात अंधश्रद्धा, अभावग्रस्त जीवन, होरपळ, उच्च शिक्षणाचा अभाव, आर्थिक मागासलेपणा असले तरीदेखील तांडा मात्र पळस फुलाप्रमाणे नेहमी बहरलेला दिसतो. अश्रू, काळोख, दारिद्रय या विषमतेचा शिकार झालेला असूनही तो निधड्या छातीने लढतो. अनेक आव्हाने, आक्रमणे आलित परंतु तांडयाने मात्र आपली ऐतिहासिक संस्कृती, भाषा, शौर्याची गाथा, संस्कृतीने दिलेल्या रणबांकुर, महापुरुषांचे पराक्रम व त्याग विसरले नाही. आपल्या ढावलो, झमरका, भजन, गीतामध्ये शब्दबद्ध करून ठेवली. ठोळी नगारा हे त्यांचे पारंपरिक वादये. केसुला (पळसफुल) हे तांडयाचे पवित्र फुल मानले जाते. तर कडुनिंब हे पवित्र वृक्ष मानले जाते. बंजारा भाषेत त्याला आईर झाड म्हणून संबोधले जाते. प्रार्थना स्थळाला ठांळो', बंगला म्हटल्या जाते.[] राठोड, पवार, चव्हाण, जाधव हे प्रमुख कूल असून त्यांचे कुलदैवत जगदंबा, महाकाली, तुळजाभवानी, हिंगलाज, सती माता, सामकी माता, बंजारी देवी याप्रमाणे आहे. महान तपस्वी हाथीराम बाबा, संत सेवालाल महाराज, संत रुपसिंहजी महाराज, राष्ट्रसंत लक्ष्मण चैतन्य बापू, डाॅ. रामराव महाराज, ईश्वरसिंह महाराज हे महान संत होऊन गेलीत. तांडयात होळी हा सण तब्बल महिनाभर साजरा होतो. दिवाळीतीला मैरा,होळीतला ढुंड आणि तीज उत्सवातला तीजनृत्य अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. यासह तांडयाने आपले वेगळेपण आजही जपलेले आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ नायक, एकनाथ (ऑक्टोबर २०२०). "स्मार्ट तांडा : गरज उपाय आणि आव्हाने". सिएमआरजे. .
  2. ^ पवार, जयराम सिताराम (२०१९). लोहगड. दिल्ली: ब्ल्यू रोज पब्लिकेशन. ISBN 978-93-5347-130-9.
  3. ^ पाटील, बळीराम (१९३६). गौर बंजारा लोगो का इतिहास.