डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंदू चौक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंंदू चौक, कोल्हापूर
कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील म. जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे, व मध्यभागी शहीद स्तंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे १९५० मध्ये बिंंदू चौकात बसवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते. हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो त्यांचा जगातील पहिला पुतळा आहे. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते फुले, आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले. आणि ९ डिसेंबर १९५० ला त्यांचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले. बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या लोकांतून भाईजींनी दोन सामान्य माणसांना हाताला धरुन नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले गेले होते. आज देशात सर्वधिक पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, मात्र ह्या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे. पुतळा उभारल्यानंतर, एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे. १७ ऑक्टोबर १९६० रोजी या चौकात दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील माणगाव आणि बिंदू चौक या स्थळांना भेटी देतात. विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते.[१][२][३][४]

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा