लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील

(डॉ. कुर्तकोटी या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. कुर्तकोटी (महाभागवत) : (मूळ नाव: लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील)
( २० मे १८७९ – निर्वाण: २९ ऑक्टोबर १९६७)
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य. अत्यंत विद्वान. वेदांतविषयक ग्रंथांचा गाढा अभ्यास. करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य. हिंदु धर्म व संस्कृत भाषेच्या प्रसाराचे मोठे कार्य. अनेक सामाजिक व राजकीय चळवळींत सहभाग.

डॉ. कुर्तकोटी (महाभागवत)
मूळ नाव लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील
जन्म २० मे १८७९
कुर्तकोटी, जि. धारवाड, कर्नाटक
निर्वाण २९ ऑक्टोबर १९६७
नाशिक (महाराष्ट्र)
गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषा कन्नड, मराठी
कार्य करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य, हिंदू धर्म व संस्कृत भाषेचा प्रसार, शुद्धिकार्य
वडील मेलगिरीगौडा

पूर्वायुष्य

संपादन

डॉ. कुर्तकोटी यांचा जन्म सन १८७९ मध्ये कर्नाटकातील धारवाड जिल्हयातील कुर्तकोटी गावी एका वतनदार घराण्यात झाला. त्यांचे कानडी प्राथमिक व इंग्रजीचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण (सन १८९३) धारवाडला झाले. त्याच सुमारास स्वामी विवेकानंदांच्या दिगंत धर्मविजयाची वार्ता कानी पडल्याने ते इतके प्रभावित झाले की धर्मप्रसारासाठी संस्कृत भाषा व वेदांतादी शास्त्रे शिकण्याचा त्यांनी निश्चय केला. त्या हेतूने त्यांनी कलकत्ता व नंतर काशी येथे शास्त्राध्ययन केले. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन काशीच्या पंडितांनी त्यांना 'विद्याभूषण' ही पदवी दिली. नंतर शृंगेरी येथे जाऊन त्यांनी तेथील शंकराचार्यांच्या मठात पारंपरिक पद्धतीने वेदांतग्रंथांचा अभ्यास केला.

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सहवासात

संपादन

योगायोगाने त्यांची सन १९०३-१९०४ च्या सुमारास श्रीब्रह्मानंदांबरोबर गाठ पडली. श्रीब्रह्मानंदांमुळे ते श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात आले. बेलधडी येथे त्यांना श्रीमहाराजांचे प्रथम दर्शन घडले. त्यांची समाधी लावून श्रीमहाराजांनी त्यांना उपनिषदांत वर्णिलेल्या शाश्वत समाधानाचा अनुभव दिला. आद्य शंकराचार्यांच्या वचनांचा खरा अर्थ त्यांना श्रीमहाराजांच्या सहवासात आल्यानंतर कळू लागला.

वैदिक काळी ज्या प्रमाणे शिष्य गुरूची सेवा करीत, त्या प्रमाणे त्यांनी श्रीमहाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांचा सहवास त्यांना सुमारे नऊ वर्षे घडला. श्रीमहाराजांनी त्यांना 'महाभागवत' ही उपाधी दिली होती. त्यामुळे श्रीमहाराजांच्या शिष्यपरिवारात ते 'महाभागवत' या नावानेच ओळखले जात. आपल्या देहत्यागानंतर डॉ. कुर्तकोटींनी गोंदवल्यास राहून तेथील व्यवस्था पहावी अशी श्रीमहाराजांची इच्छा होती. पण ते काम आपल्या 'शक्तीबाहेरचे' आहे असे डॉ. कुर्तकोटींना वाटत असल्याने त्यांनी त्यासाठी रुकार दिला नाही.

श्रीमहाराजांच्या महासमाधीनंतर डॉ. कुर्तकोटींनी आपल्याजवळील श्रीमहाराजांच्या पादुका समाधिमंदिरात स्थापन करण्यासाठी दिल्या. (श्रीमहाराज देहात असतानाच या पादुकांना त्यांचा पदस्पर्श झाला होता व नंतर याच पादुका गोंदवले येथील समाधिमंदिरात स्थापन करण्यात आहेत.) समाधिमंदिराच्या वर असणारी श्रीगोपालकृष्णाची मूर्तीही त्यांनी जयपूरहून करवून आणली होती. श्रीमहाराजांच्या निर्वाणानंतर काही वर्षे ते पुण्यतिथीच्या उत्सवासाठी नियमित येत असत.

सामाजिक व राजकीय कार्य

संपादन

या नंतर त्यांनी संस्कृतच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था' (पुणे), 'दि इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी' (अमळनेर), 'संस्कृत ऍकेडमी' (बंगलोर) या संस्था काढण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 'The Heart of BhagavadGeeta' या त्यांच्या प्रबंधाला वॉशिंग्टन विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली. वेदांताचे खरे मर्म जाणणारे जे काही थोडे विद्वान त्या काळी भारतात होते, त्यांपैकी डॉ. कुर्तकोटी एक होते असे जाणकारांचे मत आहे.

वैदिक धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने अशा योग्यतेचा पुरूष शंकराचार्य पीठावर आसीन झाल्यास, त्या कार्याला चांगला हातभार लागेल असे वाटल्याने त्यांना तशी विनंती करण्यात आली. आपल्या ध्येयाला पूरक म्हणून लोकमान्य टिळकांच्या इच्छेने त्यांनी करवीर पीठाचे (कोल्हापूर) शंकराचार्यत्व स्विकारले. (३ जून १९१७) पण नंतर कोल्हापूरच्या छत्रपतींशी काही कारणावरून बेबनाव झाल्याने ते एका छाटीनिशी तेथून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना श्रीमहाराजांचे दर्शन झाले होते.

सन १९२१ ते सन १९३९ या काळात त्यांचे नाशिक येथे वास्तव्य झाले. हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी मोठे कार्य केले. परधर्मात गेलेल्या अनेक हिंदूंना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. अनेक राजकीय व सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध आला. असे असले तरी त्यांचे अंतरंग श्रीसद्गुरूंच्या चरणांशी गुंतलेले असे. २९ ऑक्टोबर १९६७ रोजी नाशिक येथेच त्यांचे देहावसान झाले.