बानू कोयाजी

स्त्रीरोगतज्ञ
(डॉ.बानू कोयाजी या पानावरून पुनर्निर्देशित)


डॉ. बानू कोयाजी (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; - पुणे, १५ जुलै २००४) ह्या महाराष्ट्रातील एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.

डॉ.बानू जहांगीर कोयाजी
जन्म ७ सप्टेंबर, इ.स. १९१७
मृत्यू १५ जुलै, इ.स. २००४
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम्.बी.बी.एस.
पेशा वैद्यकीय
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४४ - इ.स. २००४
प्रसिद्ध कामे माजी चेअरपर्सन, के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे
पदवी हुद्दा अध्यक्ष, के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे
धर्म पारसी
जोडीदार जहांगीर
वडील पेस्तनजी
आई बापईमाई
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९९१), रेमन मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९९३)
संकेतस्थळ
http://www.kemhospital.org/banoo.html

शिक्षण

संपादन

बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईंनीही १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅंट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. बानूबाई स्त्रीरोग आणि प्रसुतिशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.[१] बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची बानूबाईंना जाणीव झाली. आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. भारतीय समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतितज्ज्ञांची गरज आहे, हे जाणून व बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.१९४० मध्ये केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी १९९९ मध्ये ५५० खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले.[]

कामाचा विषय

संपादन

डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६००हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले. डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या.[] डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ'चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ'च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.[]

योगदान

संपादन

परिवार नियोजन, जनसंख्या नियंत्रण, समाज सेवा या विषयांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

चरित्र

संपादन

पुरस्कार

संपादन
  • १९८९- पद्मभूषण
  • १९९१- पुण्यभूषण
  • १९९३- रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय सन्मान
  • १९९३- एस.एन.डी.टी. विद्यापीठाची डी.लिट
  • १९९५- पुणे विद्यापीठ सन्मान

हे ही पहा

संपादन
  • सविता भावे
  • के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे

संदर्भ

संपादन
  1. ^ "बानो जहॉंगीर कोयाजी - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2019-11-12 रोजी पाहिले.
  2. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १८९. ISBN 978-81-7425-310-1.
  3. ^ "डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभाचे आयोजन | eSakal". www.esakal.com. 2019-11-12 रोजी पाहिले.