डहाणू किल्ला

(डहाणूचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

डहाणूचा किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

महाराष्ट्र राज्यामधील पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकापासून ४-५ किलोमीटर अंतरावर डहाणू खाडीच्या तटावर एक पुरातन किल्ला आहे. डहाणू खाडीच्या उत्तरकडे लागूनच हा किल्ला बांधला होता. खाडीच्या दक्षिणेकडे मुख्यतः कोळी समाजाची वस्ती आणि उत्तरकडे मोठा डहाणू आहे[].

पोर्तुगिजांनी सन १५३३-३४ मध्ये हा किल्ला बांधला. मुघलांनी १५८२ मध्ये त्यावर आक्रमण केले होते पण ते परतवले गेले. सन १७३९ च्या मोहिमेत चिमाजी आप्पाने ह्या परिसरातून पोर्तुगिजांचे बस्तान उठवले त्याबरोबर हा किल्लाही मराठ्यांकडे आला. सन १८१८ च्या इंग्रज-मराठा करारानंतर डहाणूचा किल्ला इंग्रजांकडे गेला.

डहाणूच्या हया किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशदार उत्तर दिशेकडे आहे. चार भक्कम बुरुज ह्या गढीला संरक्षित करतात. गडाला बारा मीटर उंच तटबंदी असल्याचा उल्लेखही सापडतो. सन १८१८ च्या एका इंग्रजी साधनात ह्या किल्ल्याला तीन मीटर रुंद व ११-१२ मीटर उंच तट असल्याचे म्हणले आहे. उरलेला किल्ला ओसाड व वापरात नसलेला आहे असेही त्यात म्हणले आहे. नंतर इथे तहसिलदाराचे कार्यालय उघडले होते. काही दिवसांनंतर ते बंद केले गेले.

प्राचीन काळी डहाणू हे एक मोठे बंदर होते. नाशिकच्या गुहांमध्ये डहाणू शहर व नदीचा उल्लेख सापडतो. नहपान राजाचा जावई उशवदत्त ह्याने डहाणू खाडीतून होडीमार्गे जाण्याची सोय केली होती असाही उल्लेख आहे[].

संदर्भ

संपादन
  1. ^ संदर्भग्रंथ; जलदुर्गांच्या सहवासात; पृष्ठ २४-२६
  2. ^ संदर्भग्रंथ; डोंगरयात्रा, पृष्ठ ८९