मानिवली गावातील झिपरू चांगो गवळी आणि सीताराम मालू गवळी हे दोघेही या लढय़ात सक्रियपणे सामील झाले. भाई कोतवाल आणि भाऊसाहेब राऊत यांनी व्हॉलेंटरी शाळा निर्माण करून सर्वप्रथम ब्रिटिश राज्यकर्त्यांना इशारा दिला. मानिवली गावातील शाळेत शिंदे गुरुजी शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र त्यातूनही ते लढय़ाला वेळ देत होते. मात्र लढा जसा परिसर सोडून दूर गेला, तसे सीताराम गवळीही दुरावले. तर लढय़ाच्या अखेरच्या टप्प्यात गोमाजी पाटील यांचा एकुलता एक पुत्र हिराजी हा ब्रिटिश पोलिसांच्या जाचाला कंटाळून आझाद दस्त्याला जाऊन मिळाला.

आझाद दस्त्यात कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे योगदान मोठे होते. गोमाजी पाटील यांच्या बरोबरीने झिपरु गवळी यांनी ब्रिटिशांविरुद्ध सक्रिय होत असताना झिपरु गवळी यांच्या पत्नी चळवळीत सहभागी होण्यासाठी घराबाहेर गेलेल्यांना निरोप पोहचविणे, भाकरी भाजी बनवून त्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी पोहचविण्याचे काम आनंदीबाई मानिवली गावात राहून करीत. ब्रिटिशांनी पुढे मानिवली गावातील स्वातंत्र चळवळीत सहभागी झालेल्यांच्या कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यात आनंदीबाई वाचल्या नाहीत, परंतु आपले पती देशाची सेवा करीत असल्याने आनंदीबाई यांनी झिपरु गवळी यांचा आणि आझाद दस्त्यातील अन्य सहकारी यांचे पत्ते सांगितले नाहीत.

झिपरू गवळी यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांची मुलगी कोदिवले येथे राहत आहे. त्यांचेही घर आता अस्तित्वात नाही.