जेम्स थॉमस मोल्सवर्थ

जेम्स थॉमस मोल्सवर्थ (इ.स. १७९५ - जुलै १३, इ.स. १८७२ हे पहिल्या मराठी-इंग्लिश आणि इंग्लिश-मराठी बृहद्‌ (मोठ्या) स्वरूपातील शब्दकोशांचे लेखक व संपादक होते.

जेम्स थॉमस मोल्सवर्थ
जन्म इ.स. १७९५
मृत्यू जुलै १३, इ.स. १८७२
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
वडील रिचर्ड मोल्सवर्थ
आई कॅथेरीन कॉब

जीवनसंपादन करा

मोल्सवर्थचा जन्म इ.स. १७९५मध्ये झाला. त्यांना लंडनच्या सेंट गाईल्स चर्चमध्ये १५ जून १७९५ रोजी बाप्तिस्मा दिल्याची नोंद आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी जेम्स ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. ३ एप्रिल १८१२ रोजी सैन्यातल्या एनसाइन या कनिष्ठ अधिकारी पदावर जेम्स मोल्सवर्थची नेमणूक करून त्याला भारतात पाठविण्यात आले. ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी (हिंदी) भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत. त्यानुसार मोल्सवर्थने मराठी व हिंदी या दोन्ही भाषा शिकायला सुरुवात केली. १८१२ साली मोल्सवर्थचे वय फक्त १७ होते. आपली मातृभूमी इंग्लंड सोडून सातासमुद्रापलीकडे भारतात, तेही लष्करातल्या नोकरीत आलेल्या १७ वर्षाच्या युवकाने १८१२ पासून पुढे वयाच्या ७७ व्या वर्षी मृत्यूला सामोरे जाईपर्यंत मराठीचा अभ्यास सोडला नाही. ७७ वर्षाच्या आयुष्यातली ६० वर्षे मराठीचा ध्यास घेतलेला हा ब्रिटिश माणूस शेवटपर्यंत अविवाहित होता.

शब्दकोशांचे स्वरूपसंपादन करा

जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक इंग्रज सैनिकी अधिकारी.मोल्सवर्थ केवळ मराठी भाषा शिकला नाही, तर त्याने त्यावर प्रभुत्व मिळवले. त्याने मराठी-इंग्रजी शब्दकोश संपादित केला. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशांसाठीही तो उपयोगी पडेल एवढ्या दर्जेदार शब्दकोश निर्मिणारा मोल्सवर्थ मराठी भाषेने झपाटला होता. शब्दकोशाची पान संख्या ९१९ होती. भाषा आणि लष्कर हे दोन्ही एका आयुष्यात सामावणारा मोल्सवर्थ शब्दकोशाच्या पहिल्या पानावर इंग्रजीत एक ब्रीदवाक्य आहे. ते असे : ‘Language is the armoury of the human mind, and it contains at once the trophies of the past, and the weapons of its future conquests.’ (भाषा हे मानवी मनाचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात भूतकाळातील पदके आणि करंडक जसे सामावलेले आहेत, तशीच त्यात भविष्यकाळातील विजयांची शस्त्रेही सामावलेली आहेत.) भाषा आणि शस्त्र यांचा विचार मोल्सवर्थ एकाच वेळी कसा करीत होता हे शब्दकोशाच्या ब्रीदवाक्यावरून पटकन लक्षात येते.

मोल्सवर्थचा मूळ मराठी-इंग्रजी शब्दकोश दिवाळी अंकाच्या आकारातील सुमारे हजारभर पानांचा होता. अक्षरे (टाईप) अतिशय बारीक ठेवूनही तो एक हजार पानांचा होता. मोल्सवर्थने त्या शब्दकोशात साठ हजार मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत दिले.

मराठीच्या शब्दकोशासाठी लहान-मोठे प्रयत्न काही ब्रिटिशांनी मोल्सवर्थच्या अगोदरही केले होते. पण मोल्सवर्थचा कोश सर्व बाबतीत सरस ठरला. मोल्सवर्थच्या या मराठी-इंग्रजी शब्दकोशाला मुंबईच्या विल्सन महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. जॉन विल्सन यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली होती. हे डॉ. जॉन विल्सन मराठी भाषेचे अभ्यासक होते. त्यांच्या प्रस्तावनेत मराठी भाषेबद्दलचे अनेक अभ्यासपूर्ण संदर्भ आढळतात. एके ठिकाणी ते लिहितात ‘मराठीत एकूण (सुमारे) तीन हजार म्हणी आहेत. त्या म्हणी या (मोल्सवर्थ) शब्दकोशात फार मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.’ शब्दांचे अर्थ देताना मोल्सवर्थने मराठी म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे अर्थही सांगितले आहेत.

शब्दकोश आणि ग्रंथ निर्मितीसंपादन करा

पश्चातसंपादन करा

मोल्सवर्थच्या शब्दकोशाबद्दल तर्कतीर्थ लक्षमणसास्त्री जोशी लिहितात-

‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वतः मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’

इतर आवृत्त्यासंपादन करा

  • शिकागो विद्यापीठाची ऑनलाइन युनिकोड आवृत्ती
  • Molesworth, J. T. (James Thomas), 1795-1872: A dictionary, English and Marathi, compiled for the government of Bombay : planned and commenced by J. T. Molesworth, continued and completed by T. Candy / 2d ed., rev. and enl. by T. Candy. (Bombay : Ganpat Krishnaji's Press, 1873)
  • A compendium of Molesworth's Marathi and English dictionary / by Baba Padmanji.

Main Author: Molesworth, J. T. 1795-1872. Other Authors: Padmanji, Baba, 1831-1906. Language(s): English Published: Bombay : [Bombay Education Society], 1863. Subjects: Marathi language > Dictionaries > English. Note: Introductory matter in English or Marathi. Physical Description: xi, 482 p. ; 26 cm. Original Format: Book Dictionaries

  • ई आवृत्ती

संदर्भसंपादन करा