जलप्रपाताच्या शक्तीची माहिती मनुष्यास पुरातन काळापासून होती; परंतु त्या शक्तीचा उपयोग प्रथम केव्हा व कसा केला गेला, याची माहिती उपलब्ध नाही. पाणचक्कीच्या रूपाने पाण्याच्या शक्तीचा प्रथम उपयोग केला गेला असावा असे वाटते. याच पाणचक्कीच्या तत्त्वाचा पुढे विस्तार होऊन व त्यात संशोधनाची भर पडून ⇨जल टरबाइनाचा शोध लागला. जलशक्तीचा उपयोग करून वीज निर्माण करण्याच्या क्षेत्रात विसाव्या शतकात फार झपाट्याने प्रगती झाली. प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहासंबंधीच्या अभियांत्रिकीतील प्रगतीमुळे बऱ्याच दूरवर विजेचे प्रेषण शक्य झाले व विजेचा वापर करणारे ॲल्युमिनियमसारखे नवीन उद्योग, घरगुती कारखाने इ. सुरू झाले. तसेच औद्योगिक व घरगुती उपयोगासाठी कोळसा,तेल आदी औष्णिक शक्तीऐवजी विजेचा उपयोग अधिकाधिक होऊ लागला. विजेचा मोठा दाब सहन करू शकतील अशा तारांचा उपयोग वीज वाहून नेण्यास केल्यामुळे मार्गात विजेचा क्षय मोठ्या प्रमाणात न होता ती लांब पल्ल्यापर्यंत नेणे शक्य झाले. टरबाइनांच्या बाबतीत नवे शोध लागून त्यांची कार्यक्षमताही वाढली. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत् ऊर्जेत करता येते. यांत्रिक ऊर्जा मुख्यतः दोन मार्गांनी मिळू शकते : (१) कोळसा, खनिज तेले, नैसर्गिक वायू,अणुऊर्जा इ. मर्यादित साठ्यांची इंधने वापरून [→ शक्ति-उत्पादन केंद्र] आणि (२) पाणी, वारा, समुद्राची भरती-ओहोटी, लाटा, सौर ऊर्जा इत्यादींतील ऊर्जांचा उपयोग करून. दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जांपैकी वाऱ्याचा साठा करता येत नाही म्हणून वाऱ्याच्या ऊर्जेपासून वीजनिर्मिती अनिश्चित अवधीत व अल्प प्रमाणतच होऊ शकते. घरगुती वापराकरिता क्वचित ठिकाणी तिचा उपयोग करतात. अमेरिकेत व्हर्‌माँट येथे सु. ६०० मी. उंचीच्या टेकडीवर ३३ मी. उंचीचा मनोरा उभारला आहे. त्यावर २० मी. लांबीची अगंज (स्टेनलेस) पोलादाची पाती असलेली पवनचक्की चालवून १,००० किवॉ. इतकी अल्प वीजनिर्मिती होऊ शकते [→ पवनचक्की]. सौर ऊर्जेपासून विद्युत् निर्मिती ⇨सौर विद्युत् घटात होऊ शकते. ती अल्प प्रमाणात असते. मानवनिर्मित उपग्रहाला वा अवकाशयानाला आवश्यक असणारी विद्युत् ऊर्जा या प्रकाराने मिळते. जल ऊर्जा निरंतर व शाश्वत स्वरूपात मिळू शकते. भारतातील नद्यांपासून सु. ४ कोटी किवॉ. वीज मिळू शकेल असा अंदाज अभ्यासकांनी बांधला आहे. तथापि भारतातील जल विद्युत् निर्मिती मॉन्सून काळात पडणाऱ्या पावसावर बहुतांशी अवलंबून आहे. जल ऊर्जेपासून विद्युत् निर्मिती करण्याच्या पद्धती व यंत्रणा यांचा समावेश जलविद्युत् केंद्रात होतो.[]

संदर्भ

संपादन