जयराम कुलकर्णी (जन्म : आंबेजवळगे-बार्शी, १७ ऑक्टोबर १९३२; - पुणे, १७ मार्च २०२०) हे एक मराठी चित्रपट अभिनेते होते. ते अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिचे सासरे लागत.

जयराम कुलकर्णी
जन्म जयराम कुलकर्णी
१७ ऑक्टोबर १९३२
आंबेजवळगे-बार्शी
मृत्यू १७ मार्च २०२०
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स.प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली. जयराम यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले.

१९५६ मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली. व्यंकटेश माडगूळकर यांचा साहाय्यक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला. आकाशवाणीवर माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन जयराम करायचे. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे सारे काम जयरामच पहायचे. व्यंकटेश माडगूळकर यांचा साहाय्यक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम यांना त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे. प्रभात रस्त्यावरील माडगूळकर यांच्या घरी गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांची ग.दि. माडगूळकर यांच्याशी भेट होत असे. ग.दि. माडगूळकर यांच्यानुळे जयराम यांची मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांशी ओळख झाली.

मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. १९७० च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अभिनय श्रेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठ-मोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली होती. त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणानेच प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला. सुरुवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम यांच्या वाट्याला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या.

जयराम कुलकर्णी यांनी आपच्या अभिनय कारकिर्दीत दीडशेहून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या.

जयराम कुलकर्णी यांची भूमिका असलेले चित्रपट

संपादन
  • अशी ही बनवाबनवी
  • आमच्यासारखे आम्हीच
  • खट्याळ सासू नाठाळ सून
  • खरं कधी बोलू नये
  • खेळ आयुष्याचा
  • गंमत जंमत
  • चल रे लक्ष्या मुंबईला
  • झपाटलेला
  • झुंज तुझी माझी
  • थरथराट
  • दे दणादण
  • नवरी मिळे नवऱ्याला
  • प्रेम दीवाने (हिंदी)
  • बाळाचे बाप ब्रह्मचारी
  • रंगत संगत