लहान आतडे
लहान आतडे (अन्य नामभेद: छोटे आतडे ; इंग्लिश: Small intestine, स्मॉल इंटेस्टाइन ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात जठरानंतर व मोठ्या आतड्याआधी येणाऱ्या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य बह्वंशाने होते.
आकार
संपादनलहान आतड्याची लांबी सुमारे 9 मी. असते व ते पोटाच्या पोकळीत मध्यभागी वेटोळे करून असते. या पोकळ नळीचा व्यास सुरुवातीस सुमारे ५ सें.मी. असून तो कमी होत शेवटी ३.५ सें.मी. होतो.
लहान आतड्याचे भाग
संपादनलहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र असे तीन भाग आहेत.
- आद्यांत्र (Duodenum) या लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाची लांबी सुमारे २५ सें.मी. असते. याचा आकार रोमन लिपीतल्या सी (C) अक्षरासारखा असून ते स्वादुपिंडाभोवती असते. पित्ताशय व स्वादुपिंडातील स्राव त्यांच्या नलिकांद्वारे आद्यांत्रात सोडले जातात.
- मध्यांत्र (Jejunum) या मधल्या भागाची लांबी सुमारे २.५० मी. असते.
- शेषांत्र (Ilium) हा शेवटचा भाग सुमारे ३.२५ मी. लांब असतो.
संरचना
संपादनलहान आतड्याची संरचना चार स्तरांची असते. याचा सर्वांत आतला स्तर म्हणजे श्लेष्मपटल. या स्तरात पाचकरस स्रवणाऱ्या ग्रंथी आपला स्राव सोडतात. श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या असून त्यात बोटासारखे उंचवटे असतात. यानंतरच्या स्तरात पाचक स्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथी तसेच अन्नघटक शोषणाऱ्या पेशी असतात. या स्तरातील पेशी दर ३-५ दिवसांनी नव्याने निर्माण होत असतात. नंतरचा स्नायुस्तर हा क्रमसंकोची स्नायूंचा असतो. या स्नायूंच्या एकामागोमाग एक होणाऱ्या पद्धतशीर आकुंचनामुळे अन्न पुढे ढकलले जाते. स्नायुस्तराच्या बाहेर संरक्षणात्मक कार्य करणारा बाह्यस्तर असतो.
लहान आतड्यात छोटे छोटे असे अनेक लसिकापेशीसमूह असतात. एकेका समूहात २०-३० लसिका ग्रंथी असतात. यांना पेर क्षेत्रे (पेर्स पॅचेस) असे म्हणतात. आतड्यातून होणाऱ्या जीवाणुसंसर्गाचा प्रतिकार करणे हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे.
कार्ये
संपादनअन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. या ग्रंथीत निर्माण होणारे स्राव जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळतात. स्रावातील विकरांमार्फत (एंझाइमांमार्फत) वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूल घटकांमध्ये रूपांतर होते व या मूल घटकांचे लहान आतड्यातील पेशींमार्फत शोषण होते. लहान आतडे हा महत्त्वाचा भाग आहे.
लहान आतड्यातील स्रावांमुळे प्रथिनांचे विघटन अॅमिनो आम्लांत, कर्बोदकांचे साध्या शर्करेत (ग्लुकोज) व मेद घटकांचे मेदाम्लांत रूपांतर होते. दिवसभरात साधारणपणे दीड लीटर स्राव लहान आतडे, यकृत व स्वादुपिंड यांमध्ये तयार होऊन तो लहान आतड्यात अन्नपचनासाठी सोडला जातो.