चैत्य पुरुष - श्रीअरविंद आणि श्रीमाताजीप्रणीत पूर्णयोगामध्ये चैत्य पुरुषाच्या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. चैत्य पुरुष हा अज्ञानमय प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये एक लहानसे चैतन्य-केंद्र असल्यासारखा असतो, असे श्रीअरविंद म्हणतात. [] याला इंग्रजीमध्ये Psychic Being अशी संज्ञा आहे. उपनिषदामध्ये याला 'अंगुष्ठ प्रमाण' असे म्हणले आहे.

चैत्य पुरुषाचे स्वरूप

संपादन

जाणिवेच्या विकसनाबरोबर वृद्धिंगत होत जाणारा ईश्वरांश म्हणजे 'चैत्य पुरुष' होय. त्यामुळे चैत्य पुरुष हा विकसनशील असतो. तो व्यक्तिगत विकसन-प्रक्रियेला आधार पुरवत असतो; शारीरिक, प्राणिक, मानसिक अस्तित्वाला आधार पुरवत असतो.[]

चैत्य पुरुषाची जडणघडण

संपादन

प्रत्येक व्यक्तीच्या केंद्रस्थानी स्थित असणारा ईश्वरी स्फुल्लिंग म्हणजे आत्मा होय; तो त्याच्या ईश्वरी उगमाशी अभिन्न असतो; तो मनुष्यातील ईश्वर असतो. पार्थिव उत्क्रांतीच्या दरम्यान, असंख्य जन्मांच्या प्रक्रियेतून, ह्या आत्म्याभोवती, म्हणजे ह्या दिव्य केंद्राभोवती चैत्य पुरुषाची क्रमश: जडणघडण होत जाते. चैत्य पुरुष पूर्ण सुघटित आणि समग्रतेने जागृत होऊन, ज्या दिव्य केंद्राभोवती त्याची घडण होत असते त्या आत्म्याभोवतीचा तो जागृत कोश बनत नाही तोपर्यंत, अशा क्षणापर्यंत येत नाही तोपर्यंत ही जडणघडण चालूच राहते. आणि एकदा तो अशा रीतीने ईश्वराशी एकत्व पावला की मग मात्र, तो त्या ईश्वराचे या विश्वातील परिपूर्ण असे साधन बनतो.[]

चैत्य पुरुषाची पूर्णता

संपादन

चैत्य पुरुष त्याच्या जन्मदात्या सच्चिदानंदाशी जोडला गेला, एकरूप झाला म्हणजे त्यास पूर्णत्व प्राप्त होते. असे पूर्णत्व प्राप्त झाल्यावर अध्यात्म आणि व्यवहार यातील विरोध पूर्णपणे नाहीसा होतो. व्यक्तीचे आंतरिक जीवन व बाह्य जीवन यातील विरोध नाहीसा होतो.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b श्रीअरविंद (१९६०). दिव्य जीवन (खंड पहिला). पाँडिचेरी: श्रीअरविंद आश्रम. pp. ४२९. ISBN 81-7058-618-6.
  2. ^ Sri Aurobindo (2012). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 28. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  3. ^ The Mother (2004). COLLECTED WORKS OF THE MOTHER. 16 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.