चैतन्य महाप्रभू

एक संतकवी
(चैतन्य महाप्रभु या पानावरून पुनर्निर्देशित)

चैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग (इ.स.१८ फेब्रुवारी १४८६ - इ.स.१४ जून १५३४) बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला. भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते.

चैतन्य महाप्रभू

मूळ नाव विश्वंभर मिश्रा
जन्म १८ फेब्रुवारी १४८६
नवद्वीप (नादिया जिल्हा),पश्चिम बंगाल
निर्वाण १४ जून १५३४ ( वय ४८)
पुरी, ओडिशा
समाधिमंदिर मायापुर,पश्चिम बंगाल
उपास्यदैवत राधा कृष्ण
संप्रदाय गौडिया
गुरू ईश्वर पुरी,केशव भारती
शिष्य अद्वैताचार्य महाराज , नित्यानंद प्रभु
भाषा बंगाली
संबंधित तीर्थक्षेत्रे मायापुर,पश्चिम बंगाल
वडील जगन्नाथ मिश्रा
आई शची देवी
पत्नी लक्ष्मी देवी आणि विष्णूप्रिया

चैतन्य चरितामृत मते चैतन्य महाप्रभुंचा जन्म १८ फेब्रुवारी १४८६[] शक संवत १७०७ मध्ये फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला[] पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नादिया) या गावी झाला,ज्याला आता 'मायापूर' असे म्हणतात. त्यांचा जन्म संध्याकाळी सिंहराशी लग्नातील चंद्रग्रहणाच्या वेळी झाला.[]

त्यावेळी पुष्कळ लोक शुद्धीकरणासाठी हरिनामचा जप करीत गंगा स्नानाला जात होते.मग विद्वान ब्राह्मणांनी चैतन्याचा जन्मकुंडलीच्या ग्रहांचा आणि त्यावेळी उपस्थित शकुनाचा अंदाज लावला की हा मुलगा आयुष्यभर हरिनामचा उपदेश करेल.[] बालपणात त्याचे नाव विश्वंभर म्हणले जात असले तरी सर्व लोक त्याला निमाई म्हणत असत, कारण तो कडुलिंबाच्या झाडाखाली सापडला होता.[] किंवा आई त्यास ‘निमाई’(निंब वृक्षाच्या सावलीत जन्मला म्हणून[]) म्हणायची.[]

गौर वर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना 'गौरांग', 'गौर हरि', 'गौर सुंदर' इ. म्हणले जात असे .[] त्यांच्या वडिलांचे नाव श्री जगन्नाथ मिश्रा (टोपणनाव पुरंदरमिश्र)[] आणि आईचे नाव शची देवी आहे.[][] किशोरवयातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.

त्यांनी भजन-गायनाच्या नवीन शैली प्रसृत केली व राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू-मुस्लिम एकता, जातपात, उच्चनीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा दिली व लुप्तप्राय झालेले वृंदावन पुन्हा वसवले. जीवनातील अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. त्यांनी आरंभलेल्या नामसंकीर्तनाचा व्यापक व सकारात्मक प्रभाव आजही पाश्चात्य जगतात आहे . असेही म्हणले जाते, की जर गौरांग नसते, तर वृंदावन आजवर एक मिथकच राहिले असते []. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्णराधा यांचा संयुक्त अवतार मानतात [].[] चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यांत कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत[] व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा अंतर्भाव होतो.[]

चैतन्य नीलाचल येथे गेले आणि जगन्नाथांच्या भक्ती आणि उपासना करण्यासाठी १८ वर्षे सतत तेथेच राहिले. याच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने गृहस्थांचा आश्रम सोडला आणि संन्यासदीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे  नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले.[]

चैतन्यांनी संन्यासदीक्षा झाल्यावर ते निलंचलामध्ये गेले.यानंतर दक्षिण भारतातील श्रीरंग क्षेत्र व सेतु बंध इत्यादी ठिकाणीही राहिले. त्यांनी हरिनामाचे महत्त्व देशाच्या कानाकोपरात प्रसार केला.[]

त्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते आहेत: - गोविंददेव मंदिर , गोपीनाथ मंदिर , मदन मोहन मंदिर , राधा रमण मंदिर , राधा दामोदर मंदिर , राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर. त्यांना असे 'सप्तदेवालय 'म्हणतात.[]

बंगालमध्ये गंगाकिनारी नवद्वीप अथवा नादिया नावाच्या गावी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, चैतन्यांचा जन्म झाला. त्या दिवशी चंद्रग्रहण होते. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ व आईचे नाव शचीदेवी.

लहानपणापासून चैतन्यांना नृत्याची आवड होती. ‘हरी’नाम उच्चारताच ते नाच करीत व त्यांचे ते नृत्य सर्वांना मोहक वाटे. नृत्य, खेळ व खोड्या करण्यात त्यांचे बालपण गेले.

चैतन्यांचे वडीलबंधू विश्वरूप १६ वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य उत्पन्न झाले आणि संसारात पडण्यापूर्वीच एके दिवशी ते घरातून निघून गेले. त्या वेळी चैतन्यांचे वय अवघे ६ वर्षांचे होते. त्यांचा वडीलभावावर फार जीव होता. त्यांच्या नाहीशा होण्याने चैतन्यांच्या बालमनावर आघात झाला व ते हूडपणा सोडून देऊन शांत बनले. ते ११ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व आतापर्यंत शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेल्या चैतन्यांनी आईच्या आग्रहास्तव पंडित गंगादास यांच्या पाठशाळेत नाव घातले. तेथे दोन वर्षे व्याकरण व दोन वर्षे साहित्याचा अभ्यास करून विष्णूमिश्र पंडितांकडे ‘स्मृति’ व ज्योतिषाचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर दोन वर्षे सुदर्शन मिश्र यांच्याकडे षड्दर्शनांचा अभ्यास करून वासुदेव सार्वभौम यांच्या पाठशाळेत न्याय व तर्कशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. अद्वैताचार्यांकडे त्यांनी वेदपठण व भागवताचे अध्ययन केले व ‘विद्यासागर’ ही पदवी मिळवली. कुशाग्र बुद्धीचे चैतन्य सर्व विद्याशास्त्र पारंगत होऊन विद्वत्‌श्रेष्ठ म्हणून आपल्या सहाध्यायांत गणले जाऊ लागले. शास्त्रार्थ करण्यात ते निष्णात होते. त्यांची तर्कसंगत विधाने ऐकून महान विद्वान व पंडितही स्तंभित होत.[]

 
नदविपातील ६० फूट चैतन्य महाप्रभु पुतळा.

विवाह

संपादन

चैतन्य महाप्रभुंचा विवाह १५-१६ वयात वल्लभाचार्यांची कन्या लक्ष्मीप्रिया सोबत झाला त्याच वेळी म्हणजे १५०२ मध्ये त्यांनी आपली स्वतःची पाठशाळा काढली व तेथे ते व्याकरणाचे शिक्षण देऊ लागले. १५०३ मध्ये त्यांनी पूर्व बंगालची यात्रा केली व आपल्या पूर्वजांच्या श्रीहट्टस्थानाला भेट दिली. तेथे त्यांना बरीच द्रव्यप्राप्ती झाली.[] १५०५ मध्ये सर्पदंशाने पत्नीचा मृत्यू झाला.त्यानंतर दुसरे लग्न नवद्विप गावात राजपंडित सनातनमिश्र यांची कन्या विष्णूप्रिया हिच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले.[][१०]

कार्य

संपादन

दिग्विजयी विद्वान केशव काश्मीरीस त्यांनी साहित्यचर्चेत पराभूत केल्याने नादियातील सर्वश्रेष्ठ विद्वानांत त्यांची गणना होऊ लागली. दुसऱ्या वर्षी ते वडिलांचे पिंडदान करण्यासाठी गयेला गेले. तेथे विष्णूपदाच्या दर्शनास गेले असता, त्यांची माधवेंद्रपुरी यांचे शिष्य ईश्वरपुरी [११] यांच्याशी भेट झाली. ईश्वरपुरींची भेट चैतन्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. दर्शन करता करताच ते एकाएकी उन्मनी अवस्थेत पोहोचले व खाली कोसळले. ईश्वरपुरींनी त्यांना सावरले आणि शुद्धीवर आणले. चैतन्यांतील पंडित नाहीसा झाला व प्रेमळ भक्त अवतरला. ईश्वरपुरींनी त्यांना ‘गोपी जनवल्लभाय नमः’ हा दशाक्षरी मंत्र देऊन अनुग्रहित केले. चैतन्यांच्या मनात लगेचच वैष्णवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मथुरेला जायचे होते परंतु त्यांच्या सोबत्यांनी त्यांचे मन वळवून त्यांना परत आपल्या गावी नेले. निमाई पंडित नडियास परतले ते पार बदलून. श्रीहरीचे ध्यान व स्मरण करीत त्याच्या भेटीकरिता ते तळमळू लागले. ‘माझा कृष्ण मला भेटवा’ असे म्हणत ते हिंडू लागले. अध्यापन व संसारातील त्यांचे लक्ष पार उडाले. तहानभूकही ते विसरले. नामसंकीर्तन करीत ते घरात बसून असत. हळूहळू त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला व चैतन्य त्यांच्या अनुयायांसह कृष्णविष्णूचे नामसंकीर्तन करीत नाचू लागले. सार्वजनिक रीत्या नामसंकीर्तनाचा हा प्रारंभ होय. चैतन्यांच्या या संकीर्तनाला खूपच गर्दी लोटू लागल्याने चैतन्य आणखी काही मंडळींसह आपला शिष्य श्रीवास पंडित यांच्या घरी रात्री संकीर्तन करू लागले. हळूहळू त्यांना माधवाचार्य, शुक्लांबर, पुंडरीक, हरिदास, नित्यानंद ही मंडळीही मिळाली व त्यांचे शिष्य बनली. १५०८ मध्ये चैतन्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ते परमेश्वरावतार समजले जाऊ लागले. त्यांनी हरिनामाचा व भजनकीर्तनाचा असा काही प्रचार केला, की बंगालच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात त्यांच्या नावाचा उद्‌घोष ऐकू येऊ लागला. चैतन्यांचा भक्तिसंप्रदाय व लोकप्रियता जशी वाढत होती तसा त्यांना होणारा विरोधही वाढत होता. हे विरोधक शाक्तपंथी तसेच सनातनी पंडित होते. त्यांनी चैतन्यांना त्रास देण्याकरिता चॉंद काजी नावाच्या मुसलमान अधिकाऱ्याकडे तक्रार केली. परिणामी सार्वजनिक संकीर्तन बंद करण्यात आले. चैतन्यांनी या विरोधास न जुमानता गावभर फिरून संकीर्तन करण्याचे ठरविले.’हरिबोल’गजरात अलोट गर्दीत चैतन्य गात, नाचत चॉंद काजीच्या घरापुढे आले. ती मिरवणूक उधळून लावण्याकरता काजीने शिपाई धाडले पण चैतन्यांचे दिव्यतेज व हरिनामाचा गजर यांत ते शिपाई भान हरपले व तेही त्या गजरात सामील झाले. एवढेच नव्हे, तर स्वतः काजीही नंतर त्यात सामील झाला. हळूहळू सर्व नवद्वीप चैतन्यांच्या हरिनामाने फुलून गेले. इस्लामधर्मीय जगाई व माधाई यांचे धर्मांतर आणि मतपरिवर्तन हे चैतन्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचे कार्य होय. १५०८ मध्ये त्यांनी श्रीकृष्णलीलांच्या अज्ञात स्थळांचा शोध केला.[]

कृष्ण भक्ति

संपादन

२४ वर्षी (१५०९) चैतन्यांनी केशव भारतींकडून संन्यासदीक्षा घेतली. आईच्या आग्रहास्तव ते जगन्नाथपुरीस जाऊन राहिले व त्यांनी भक्तिमार्गाचा प्रचार सुरू केला. ते स्वतःस राधा समजत व कृष्णाच्या भेटीकरिता तळमळत भजन करीत. येथेच त्यांनी त्यांचे न्यायशास्त्राचे गुरू वासुदेव सार्वभौम यांना ब्रह्मज्ञानापेक्षा भगवत्‌भक्तीचे श्रेष्ठत्व पटवून दिले व आपल्या पंथात आणले. काही वर्षांनंतर त्यांनी उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारताच्या तीर्थयात्रा केल्या. वृंदावन येथे चैतन्यांनी आपल्या वैष्णव संप्रदायाची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या आधी माधवेंद्रपुरी यांनी मथुरेस कृष्णभक्तीचा प्रचार सुरू केला होताच. वृंदावनाहून परत येताना चैतन्यांना रूप व सनातन हे गोस्वामी भेटले. चैतन्यांनी त्या दोघांना वृंदावनास वैष्णवधर्माचा प्रसार करण्यासाठी पाठविले.[]

आयुष्याची शेवटची अठरा वर्षे (१५१५—३३) चैतन्य महाप्रभूपुरतीच भगवत्‌भक्तीचा प्रचार करत होते. जगन्नाथमंदिरात गरुडस्तंभापाशी डोळे मिटून ते तासन्‌तास उभे रहायचे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असायच्या. मठात परतल्यावर गंगाधर पंडित त्यांना भागवत  वाचून दाखवायचे. त्यांचे बालमित्र स्वरूप, दामोदर हे त्यांना निरनिराळ्या कवींची कृष्णाविषयीची गाणी म्हणून दाखवायचे. त्यातच चैतन्यप्रभूंची समाधी लागायची. दरवर्षी रथोत्सवाच्या वेळी बंगालच्या कानाकोपऱ्यांतून चैतन्यांची भक्तमंडळी पुरीला जमून चार महिने त्यांच्या सहवासात काढायची. या रथोत्सवाने बंगाल व ओरिसा प्रांतीयांत जवळीक उत्पन्न झाली.आषाढ शके १४५५ मध्ये जगन्नाथाच्या रथयात्रेत आनंदाने आत्मविस्मृत होऊन रथासमोर नाचत असताना महाप्रभूंच्या डाव्या पायाला विटकरीची कोच बोचली. तिसऱ्या दिवशी पायाच्या वेदना वाढल्या व त्यांना वात झाला. त्यातच भजनयात्रा समुद्रकिनाऱ्यावरून चालली असता अथांग समुद्राचे निळे-निळे पाणी पाहून चैतन्यांना भास झाला, की घननीळ श्रीकृष्ण समोर उभा आहे. त्यांनी ‘हे कृष्ण, हे श्याम’म्हणत समुद्राकडे धाव घेतली व पाहता पाहता ते त्यात विलीन झाले. रविवार सप्तमीला चैतन्य महाप्रभूंची प्राणज्योत निमाली.[]

चैतन्य महाप्रभूंचा विलक्षण प्रभाव बंगाल आणि लगतच्या प्रदेशावर पडला. भगवत्‌भक्तीचा प्रचार व प्रसार महाराष्ट्र आणि अन्य प्रांतांत चैतन्यांच्या पूर्वीच झालेला होता पण बंगाल, ओरिसा इ. पूर्वाचल प्रदेशांत पूर्वापार चालत आलेला सनातन धर्मच रूढ होता. चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मज्ञानापेक्षा भगवत्‌भक्तीचे सामर्थ्य लक्षात घेऊन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यापेक्षा विद्वानांपासून जडांपर्यंत, ब्राह्मणांपासून शूद्र, अंत्यज, चांडालांपर्यंत सर्वांना सहजसुलभ असा भक्तिमार्ग उपलब्ध करून दिला हरिनामसंकीर्तनाचा प्रसार सुरू केला. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी बंगाल-ओरिसातच नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांनी त्याकरिता स्वतः ग्रंथरचना केली नाही परंतु इतरांना काव्यनिर्मितीची प्रेरणा दिली. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी 'चैतन्यचरितामृत'  हा ग्रंथ लिहून बंगाली काव्यरचनेस सुरुवात केली. वृंदावनदासाने 'चैतन्यभागवत'  रचले.[] लोचनदास कवीने 'चैतन्यमंगलची' रचना केली.[१२] अशा प्रकारे चैतन्यांनंतर (१६ शतकात) बंगाल-ओरिसात पांचाली शैलीत साहित्यनिर्मितीस आरंभ झाला आणि नंतर साहित्यिक दृष्ट्या बंगाली भाषा व साहित्य मान्यता पावू लागले.[]

मृत्यु

संपादन

चैतन्य महाप्रभुंचा मृत्यु १४ जून १५३४ ( वय ४८) मध्ये पुरी, ओडिशा मध्ये झाला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "1486". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-05.
  2. ^ a b "चैतन्य महाप्रभु - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2019-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f g "चैतन्य महाप्रभु". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-09-28.
  4. ^ "Chaitanya Mahaprabhu". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-06.
  5. ^ a b c d e f g h i j k "चैतन्य महाप्रभु". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-07 रोजी पाहिले.
  6. ^ "चैतन्य महाप्रभु का परिचय - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-07 रोजी पाहिले.
  7. ^ "गौड़ीय संप्रदाय के प्रवर्तक" (हिंदी भाषेत). Unknown parameter |month= ignored (सहाय्य)[मृत दुवा]
  8. ^ "ब्रह्म-माधव गौड़ीय मत सत्र" (इंग्लिश भाषेत). Sri Krishna is so maddened by it that He accepts the form of Lord Caitanya Mahaprabhu, who descends in the mood of RadharaniCS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ a b गौड़ीय साहित्य
  10. ^ "चैतन्य महाप्रभु का विवाह - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-07 रोजी पाहिले.
  11. ^ "चैतन्य महाप्रभु की कृष्ण भक्ति - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-07 रोजी पाहिले.
  12. ^ "शालग्राम.नेट - लोचनदास ठाकुरांचे जीवन". 2013-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-21 रोजी पाहिले.