चिंदोडी लीला (इ.स. १९३७ - २२ जानेवारी, इ.स. २०१०) या कन्नड रंगभूमीवरच्या एक विख्यात अभिनेत्री होत्या.

त्यांच्या अभिनयाची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षालाच झाली. पुढे सुमारे साठाहून अधिक वर्षे त्या कानडी नाटकांमधून अभिनय करीतच राहिल्या. त्यांनी भूमिका केलेल्या पोलिसना मगलू (पोलिसाची मुलगी) या नाटकाचे तब्बल ४,५०० प्रयोग झाले,आणि या उच्चांकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. लीलाबाई कर्नाटक नाटक अ‍ॅकॅडमीच्या सुमारे ३० वर्षे अध्यक्ष होत्या. त्या सुरुवातीला बेळगाव नगरपालिकेच्या नगरसेवक होत्या. निवडून येण्यासाठी बेळगावच्या मराठी मतदारांचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी 'छत्रपती शिवाजी' या नाटकात भूमिका करून नाटकाचा प्रयोग बेळगावमध्ये केला होता. नंतरच्या काळात सुमारे ६ वर्षे त्या कर्नाटक विधान परिषदेच्या नामदार होत्या. चिंदोडी लीला यांनी ५८नाटकांमध्ये भूमिका केल्या आणि या नाटकांचे एकूण जवळजवळ २०,००० खेळ झाले.

चिंदोडी लीला यांनी नाट्यलेखनही केले होते. त्यांनी लिहिलेल्या हळ्ळी हुडुगी (ग्रामकन्या) या नाटकाचे सुमारे १०,००० प्रयोग झाले. ज्यावेळी हे नाटक बेळगावमध्ये होत होते, तेव्हा राज कपूरचा जिस देश में गंगा बहती है हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु प्रेक्षकांची गर्दी हळ्ळी हुडुगीकडे असल्याने तो चित्रपट जिथे लागला होता, ते चित्रपटगृह ओस पडले होते. चिंदोडी लीला यांनी २० कन्नड चित्रपटांतही कामे केली. कित्तूर चेन्नम्मा, गाली गोपुर, कृष्णदेवराय, शरपंजर हे त्यांतले काही प्रमुख चित्रपट होत. चिंदोडी लीला यांनी निर्मित केलेल्या हंसलेखा आणि पंचाक्षरी गवयी या चित्रपटांनी अनेक पुरस्कार जिंकले.

बाईंच्या नावाने बेळगावमध्ये आत्तापर्यंत चिंदोडी लीला रंगमंदिर नावाचे नाट्यगृह होते. सप्टेंबर, इ.स. २०११मध्ये ते पाडायला सुरुवात झाली. आता तेथे गणपती विसर्जनासाठी मोठा हौद होणार आहे.

गौरव व पुरस्कार

संपादन
  • पद्मश्री पुरस्कार
  • आंध्र प्रदेश सरकारच्या संगीत नाटक अ‍ॅकॅडमीचा कृष्णदेवराय पुरस्कार
  • गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोलिसना मगलू या नाटकाच्या उच्चांकी ४५०० खेळांची नोंद