चरित्र त्यांचे पहा जरा

महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजात अनेक कर्तृत्त्ववान पुरुष होऊन गेले. शिक्षण-संशोधन, उद्योग, पत्रकारिता, आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये दिगंबर जैन समाजातील जी ठळक नावे आहेत त्यांच्यावर चरित्रपर लेखांचे "चरित्र त्यांचे पहा जरा" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि बरेच काही नवीन शिकायलाही मिळते. हे पुस्तक जाणत्या वाचकांना आवडेल. त्याबरोबर ज्या वाचकांना या महापुरुषांची ओळख नाही त्यांना तर हे वाचून आनंदच होईल.  या पुस्तकात प्रो. आ.ने. उपाध्ये आणि डॉ. पद्मनाभ जैनी या संशोधक प्राध्यापकांची चरित्रे आहेत. भारतात आणि इंग्लंड अमेरिकेत जैन धर्म आणि साहित्याच्या संशोधनाची मुहूर्तमेढ या थोर पुरुषांनी रोवली. आचार्य समंतभद्र महाराजांच्या आशीर्वादाने डॉ. जैनी यांची कारकीर्द घडली, पंडित सुखलालजी संघवी यांच्यासारख्या थोर विद्वानांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. कारंजा, बनारस, लंडन, आणि अमेरिका अशी त्यांची वाटचाल झाली. तर प्रो. उपाध्ये यांनी भारतातच राहूनही जैन संशोधनाची ध्वज जगभर फडकावली. अनेक दुर्मिळ आणि श्रेष्ठ ग्रंथांचे सटीक संपादन करून त्यांना प्रकाशात आणले. प्राकृत भाषेच्या आणि जैन साहित्याच्या अभ्यासाला एक नवीन उंची प्राप्त करून दिली. त्यांनीच डॉ. जैनी यांना जैन धर्मावर इंग्रजी भाषेत संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सप्रमाण ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा दिली. अशा सगळ्या गोष्टींचा मुळापासून आढावा या पुस्तकात घेतलेला आहे.

"जैन बोधक" या आद्य जैन नियतकालिकाचे संस्थापक शेठ हिराचंद नेमचंद यांचेही चरित्र या पुस्तकात आहे. लोकमान्य टिळक यांच्या "केसरी"नंतर अवघ्या चार वर्षांनी सुरू झालेले हे मासिक अद्याप सुरू आहे. जैन समाजाला- विशेषतः महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजाला- डोळसपणे विचार करायची सवय लावणाऱ्या या प्रख्यात समाजसुधारकाने आपल्यावर किती उपकार करून ठेवले आहेत हे समजून घेणे आपले कर्तव्य आहे. याच थोर पुरुषाने भारतातील एका महान उद्योगपतीला जन्म दिला. शेठ वालचंद हिराचंद हे ते धडाडीचे उद्योगपती होत. पृथ्वी, जल, आणि आकाश अशा तीनही क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये पायाभरणीचे काम शेठ वालचंद यांनी केले. प्रीमियर ऑटोमोबाईल हा कार कारखाना, सिंदिया नॅव्हिगेशनच्या रूपात जलमार्गाच्या वाहतुकीची स्वदेशी पायाभरणी, आणि हिंदुस्थान ऐरोनौटिक्सच्या रूपात विमानांचा पहिला कारखाना त्यांनी सुरू केला. त्यांची जीवनगाथा प्रत्येक मराठी माणसाने मुळातून वाचावी अशीच आहे.

आज राजकारणाला अतिशय हीन स्वरूप आलेले आहे. जातीपातींच्या कुंपणांनी त्याला आणखी कुजवून टाकले आहे. मात्र देश स्वतंत्र होण्याआधी आणि त्यानंतरच्या काही काळात स्वतंत्र प्रज्ञेच्या देशभक्त आणि करारी जैन पुरुषांनी या क्षेत्रातही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला होता. दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठे हे ब्रिटिश काळातील मुंबई प्रांताचे अर्थमंत्री, फुलचंद गांधी हे स्वतंत्र भारतातील हैद्राबाद राज्याचे मंत्री, आणि महाराष्ट्र विधानसभेतील आमदार आणि शहरी बँकिंग क्षेत्रातील सहकारमहर्षी सुंदरलाल सावजी कळमकर अशा तीन राजकीय नेत्यांची चरित्रे या पुस्तकात आहेत. आजच्या पिढीला दुर्दैवाने विस्मरणात गेलेल्या या नेत्यांची चरित्रे नक्कीच प्रेरणा देतील यात शंका नाही.

या पुस्तकात एक चरित्र आहे नाना रामचंद्र नाग या धर्मोपदेशक पुरुषाचे. मूळ ब्राह्मण असलेल्या या थोर पुरुषाने डोळस श्रद्धेने जैन धर्माचा अंगिकार केला आणि एखाद्या मिशनऱ्याप्रमाणे जैन धर्माच्या प्रसाराला वाहून घेतले. जैन धर्मात जन्माला येऊन मिळालेल्या अहिंसा अनेकांत अशा उच्च संस्कारांना डावलणाऱ्या, आपल्या श्रेष्ठ ग्रंथांकडे कानाडोळा करणाऱ्या समाजाला त्यांनी शिकवले. त्यांचेही चरित्र या पुस्तकात आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व. अण्णासाहेब लठ्ठे या सत्यशोधक नेत्याच्या एक पाऊल पुढे जाऊन या महापुरुषाने गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अनेक अभिनव प्रयोग करून ते यशस्वी केले, रयत शिक्षण संस्थेसारख्या अवाढव्य शिक्षण संस्थेची स्थापन केली. भाऊरावांच्या जीवनात जैन संस्कारांचा किती मोठा वाटा होता हे या पुस्तकातून कळते. 

हे पुस्तक दिगंबर जैन समाजातील कर्तृत्त्ववान पुरुषांवर असले तरी ही चरित्रे सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहेत. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची ही गुरुकिल्ली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. [१]

  1. ^ Joharapurkar, Amit (2023). Charitra tyanche paha jara (चरित्र त्यांचे पहा जरा). India: Excel Publications. pp. 1–91. ISBN 978-93-91708-14-6.