घुमान साहित्य संमेलन


नामदेव महाराज यांच्या घुमान या कर्मभूमीत सरहद संस्थेतर्फे ३, ४ व ५ एप्रिल २०१५ रोजी, ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तत्वचिंतक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या संमेलनाचे अध्यक्ष होते. ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, संमेलनाचे उद्घाटक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संतसाहित्याचे अभ्यासक व या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मावळते संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंग, ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक संजय नहार, डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, साहित्य संमेलन महामंडळाचे सर्व पदाधिकारी आणि हजारो साहित्य रसिक या संमेलनाला उपस्थित होते.

संत नामदेव यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी घुमान या पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील गावाला आपली कर्मभूमी बनवले आणि महाराष्ट्र व पंजाबमध्ये अनोखा स्नेहसंबंध निर्माण केला. या साहित्य संमेलनामुळे या ऋणानुबंधाला उजाळा मिळाला.

आता सरहद संस्थेला दुसऱ्यांदा यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडीयमवर भरवण्यासाठी आयोजक पदाचा मान मिळाला आहे.

नवी दिल्ली येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासिका व साहित्यिक प्रा. डॉ. तारा भवाळकर असणार आहेत. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे. त्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली १९५४ साली दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, पण तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला नव्हता.

या आगामी संमेलनाच्या आधीच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित केला असल्याने या संमेलनाचे महत्व वाढले आहे. हे संमेलन २१, २२, आणि २३ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय असणार आहे. सरहद संस्थेने नवी दिल्लीत या संमेलनाच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.


पहा : साहित्य संमेलने

संदर्भ

संपादन