ग्लिरिसीडिया

एक वनस्पती कुळ

ग्लिरिसीडिया ही एक वनस्पती शास्त्रातील जातकुळी (Genus) आहे. विशेष करून गिरीपुष्प या वनस्पतीच्या नावाने ओळखला जातो.

Gliri sepi 081226-4794 F ipb
गिरीपुष्प

गिरीपुष्प संपादन

मध्य अमेरिकेत जन्मस्थान असलेला गिरीपुष्प हा तसा सर्वत्र आढळणारा आणि सुपरिचित आलेला वृक्ष असून त्याचा प्रसार वसाहतवाद्यांनी कॉफी, कोको यांच्या लागवाडीवर सावली देण्यासाठी कॅरिबिअन बेटे, फिलिपाईन्स, भारत, श्रीलंका आणि पश्चिम आफ्रिका या देशात केला. श्रीलंकेत या वृक्षाचे आगमन १८९९ साली त्रीनिदाद येथून झाले. मुंबईत १९१६ साली प्रथम लावण्यात आलेले या वृक्षाचे रोप श्रीलंकेतील पॅराडेनिया उद्यानातून आणलेल्या बीपासून तयार करण्यात आले होते. तसं पाहिलं तर गिरीपुष्पाची लागवड ही गेली अनेक वर्षे होत आहे. याचा पुरावा म्हणजे वेगवेगळ्या भाषांत विविध नावांनी हा वृक्ष ओळखला जातो. स्पॅनिश वसाहतवाद्यांनी कोकोला छाया देणारा वृक्ष म्हणून या वृक्षाचे नाव मदर ऑफ कोको असे ठेवले. ग्लिरीसिडीया हे वनस्पती शास्त्रातील नाव ग्लिरीस् म्हणजे उंदीर व सिडो म्हणजे मारक अशा दोन शब्दांनी बनवले आहे. याच्या बिया आणि साल यांत उंदीरनाशक विषारी द्रव्य असल्यामुळे त्याचे ग्लिरीसिडीया हे नाव सार्थक ठरते. मराठीत या नावाचे योग्य भाषांतर करायचे तर त्याला मुषकारि म्हणता येईल,पण त्याला नाव पडले आहे गिरीपुष्प. याची पाने विषारी असल्यामुळे जनावरे पण खात नाहीत.[१] त्यामुळे शेताच्या बांधावर ही झाडे लावली जातात. हा वृक्ष भारतातील उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारा असला तरी, मूलतः परकीय वृक्ष असून अतिशय जलद गतीने वाढणारा, मध्यम उंचीचा आणि बुंध्यापासून अनेक फांद्या फुटणारा म्हणून इतर वृक्षांपेक्ष वेगळा असा ओळखला जातो. बुंध्यावर व फांद्यांवर पांढरे ठिपके असतात. याचे लाकूड इतर स्थानिक वृक्षांपेक्षा ठिसूळ असते. त्यामुळे वाऱ्याच्या झोताने फांद्या मोडण्याचे प्रमाणही जास्तच असते. पानांच्या मागील बाजूवर काळसर ठिपके असतात. हिवाळ्यात पानगळीवर निष्पर्ण फांद्या फुलपाखरांसारख्या निळसर गुलाबी फुलांच्या गुच्छांनी डंबरून जातात. फुलल्यापासून साधारण २-३ आठवड्यांपर्यंत हा बहर टिकतो आणि या कालावधीत गिरीपुष्प कोणाचंही लक्ष वेधून घेतो. या फुलात मध असतो आणि त्यावर काही विशिष्ट प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यापैकी सुतार माशी ही प्रमुख असून ती कित्येक किलोमीटर दूर अंतरापर्यंत परागण करते असा उल्लेख आढळतो. यशस्वी परागण झालेल्या फुलांतून उन्हाळ्याच्या सुरुवातीस चापट्या हिरव्या शेंगा दिसू लागतात. वाढत्या उन्हाबरोबर त्या पिकून पिवळट तपकिरी होतात. शेंगेत ८-१० तपकिरी, चपट्या, गोल आकाराच्या बिया असतात. पूर्ण पिकल्यावर शेंग जोरात तडकून बिया दूरवर फेकल्या जातात.

दरवर्षी व्यवस्थित छाटणी केल्यास त्याला नवीन धुमारे फुटून भरपूर पालवी येते. हा पाला त्यातील भरपूर नत्रामुळे शेतात जैविक खात म्हणूनही बहुमुल्य आहे. यांच्या पानांचा अर्क एक्झिमा व अन्य त्वचा रोगांवर गुणकारी आहे. लाकूड सावकाश जळत असल्यामुळे त्याचा धूर कमी होतो. मध्य अमेरिकेत पूर्वापार याची पाने व सालींची पूड माक्यासोबत घालून उंदीर मारण्यासाठी वापरतात.

संदर्भ संपादन