ग्रेगोरीयन दिनदर्शिका

(ग्रेगरीय दिनदर्शिकेचा इतिहास या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.

एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे.

इतिहास

संपादन

जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आहे. निदान गेली शंभर वर्षे सगळे आंतरराष्ट्रीय कारभार ग्रेगरीय दिनदर्शिका वापरून चालत आहेत.

प्रसिद्ध रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४५ मधे आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. त्यापूर्वी रोममधे प्रचलित असलेल्या दिनदर्शिकेप्रमाणेच ती दिनदर्शिका पृथ्वीच्या सूर्यभ्रमणावर अधिष्ठित होती, पण तिच्यातली कालमापनपद्धत सीझरच्या सल्लागारांनी बऱ्यापैकी सुधारलेली होती. पुढे ५७० वर्षांनी डायोनिसीअस एग्झिगस नावाच्या (सध्या रोमेनिया ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या) एका वजनदार मठवासीने त्यावेळच्या समजूतीनुसार येशू ख्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला होता असे धरून तेव्हाचा जू.स. ५७० लोकांनी इ.स. ५२५ मानावा असे सुचवले. ती सूचना हळूहळू युरोपीय लोकांनी स्वीकारली. इ.स. १५८२ पर्यंत ज्युलियन दिनदर्शिकेमागे असलेली कालमापनपद्धतच वापरण्यात येत असे, पण तिच्यात बरेच दोष उरले होते.

तेव्हा इ.स. १५८० मधे रोममधल्या क्रिस्ती धर्मगुरू पोप तेराव्या ग्रेगरींनी विद्वानांचे एक मंडळ स्थापून त्या मंडळावर कालमापनपद्धत निर्दोष करण्याची जबाबदारी सोपवली. त्या मंडळाच्या शिफारसींनुसार इ.स. १५८२ मध्ये सध्याची ग्रेगरीय दिनदर्शिका वापरायला रोममध्ये, हळूहळू युरोप खंडात आणि मग सगळ्या जगात सुरुवात झाली. ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसारचे एक वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूकपणे असावे त्यापेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिक लांबच आहे! म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या शंभराव्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल!

पण ४०० वर्षांपूर्वी पोप ग्रेगरींनी नियुक्त केलेले खगोलशास्त्रज्ञ सौरवर्षाचे कालमान केवळ सरासरी २६.३ सेकंदाच्या अगदी किरकोळ फरकाने चुकावेत ह्या गोष्टीत दिसणारे त्यांचे खोल ज्ञान फार कौतुकाचे निःसंशय आहे.

महिने

संपादन

ग्रेगरी दिनदर्शिकेमध्ये एकूण १२ महिने पुढीलप्रमाणे आहेत.

१. जानेवारी २. फेब्रुवारी ३. मार्च ४. एप्रिल ५. मे ६. जून ७. जुलै ८. ऑगस्ट ९. सप्टेंबर १०. ऑक्टोबर ११. नोव्हेंबर १२. डिसेंबर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Introduction to Calendars". aa.usno.navy.mil (इंग्रजी भाषेत). 2019-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-13 रोजी पाहिले.