ग्रामीण जीवनाशी व परिसराशी अनुरूप असे शिक्षण म्हणजे ग्रामीण शिक्षण होय. ग्रामीण जीवन आणि नागरी जीवन यांत फार मोठे अंतर असते. राहण्याची घरे, आरोग्यविषयक सोयी, रस्ते व वाहतूकव्यवस्था, चरितार्थाची व करमणुकीची साधने आणि सार्वजनिक जीवन यांसारख्या बाबतींत शहरांपेक्षा खेडेगावांत अनेक गैरसोयी असतात. अशा गैरसोयी व जगापासून अलगपणा यांमुळे ग्रामीण शिक्षणावर फार मोठा परिणाम होतो. विद्यार्थी, पालक, शिक्षण, शिक्षणाधिकारी, अभ्यासक्रम, शैक्षणिक प्रशासन आणि शिक्षणखर्च या सर्वांचा विचार करताना खेड्यातील वस्तुस्थितीचा विचार करणे भाग असते.

ग्रामीण शिक्षणाच्या विचाराने स्थूलमानाने चार घटक आहेत. देशात प्रचलित असलेल्या शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागात प्रसार आणि तो करण्यातील अडचणी यांत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, औद्योगिक, महाविद्यालयीन आणि प्रौढांच्या अशा सर्व शैक्षणिक टप्प्यांचा समावेश होतो. दुसरा विचार शैक्षणिक तसेच शिक्षणोपयोगी अशा तंत्रांसंबंधी आहे. खेड्यातील शिक्षणविषयक अडचणी दूर करून तेथील जनतेला अधिकाधिक चांगले शिक्षण मिळण्याकरिता निरनिराळ्या तंत्रांचा कसा उपयोग करता येईल ते पहावे. तिसरा भाग म्हणजे, ग्रामीण जनतेकरिता नागरी शिक्षणपद्धतीपेक्षा निराळी अशी शिक्षणपद्धती असावी की काय हा होय. चौथा विचार म्हणजे व्यापक ग्रामोद्धाराच्या दृष्टीने प्रौढ शिक्षणाचा उपयोग कसा करून घेता येईल, यासंबंधी आहे.

शहरांमध्ये पूर्वप्राथमिकपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असतात. त्यांच्याशी तुलना करताना ग्रामीण भागातील सोयी अत्यंत अपुऱ्या असतात. प्रगत आणि अप्रगत अशा दोन्हीही देशांत असे अंतर दिसून येते. अगदी पुढारलेल्या देशांतही लहान खेडेगावात फक्त प्राथमिक शाळा असू शकते. माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या सोयी अगदी लहान गावात उपलब्ध नसतात. मागासलेल्या देशांत अशी अनेक खेडी आहेत, की जेथे अद्याप प्राथमिक शिक्षणाच्या चार इयत्तांचीही शाळा नाही.

ग्रामीण भागात चांगले शिक्षण देण्याच्या दृष्टीने अनेक अडचणी येतात. मुलांची संख्या थोडी म्हणून शाळा काढता येत नाहीत आणि काढलीच तर एकाच शिक्षकाकडे सर्व इयत्ता सोपवाव्या लागतात. खेड्यापाड्यांत जाण्यास शहरी शिक्षक नाखूष असतात. मुलींच्या शाळेकरिता शिक्षिका मिळू शकत नाहीत. हस्तव्यवसाय, विज्ञान, चित्रकला, गायन इ. विषयांचे खास शिक्षक मिळत नाहीत. तपासनीस आडगावी जाण्यास नाखूष असतात त्यामुळे देखरेख कमी राहते आणि शिक्षणाचा दर्जाही कमी असतो. समाज मागासलेला असल्याने तो शिक्षकावर गैरवाजवी हुकमत आणि अधिकार चालवितो. इमारत, साधनसामग्री, ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. शिक्षणाची साधने खेड्यात दुर्मिळ असतात.

ग्रामीण परिस्थितीचा विचार करून, आहे त्या परिस्थितीत अधिकाधिक चांगले शिक्षण देण्याकरिता काही विशेष तंत्रांचा व उपायांचा उपयोग करता येतो. तीनचार लहान शाळा एकत्र करून एकच मोठी केंद्रशाळा ठेवल्यास शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवता येतो. फिरते शिक्षक वा फिरत्या मोटारगाड्या वा रेल्वेचे डबे यांचा उपयोग करून विज्ञान, हस्तव्यवसाय इ. विषयांच्या शिक्षणाची सोय करता येते. शिक्षकांना रहावयास घर, शेत व दुभते जनावर दिले असता, ते तेथे कायम राहू शकतात. मधल्या वेळचे खाणे, दूध, पुस्तके, कपडे इत्यादींची सोय केली, तर मुलांची उपस्थिती वाढू शकते. शेतीच्या कामाचे हंगाम टाळून शाळा भरविल्यास अधिक मुले येऊ शकतात. रेडिओ, दूरचित्रवाणी इ. साधनांच्या द्वारे विविध प्रकारचे शिक्षण खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचविता येते. ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांना खास असे प्रशिक्षण देता येते. सारांश देश, काल आणि द्रव्यबल यांना अनुसरून संशोधन बुद्धीने आणि प्रयोगशील वृत्तीने अनेक तंत्रांचा अवलंब करून ग्रामीण शिक्षण सर्वांगीण करता येते.

ग्रामीण व नागरी शिक्षण हे समान असावे, हा एक वादाचा मुद्दा आहे. एका पक्षाचे म्हणणे आहे की, असा भेद नसावा. लोकशाही आणि समान संधी यांच्या दृष्टीने अशी भिन्नता अनिष्ट आहे. बालपणीच मुलांचे जीवन खेड्यात बांधून टाकल्यास महत्त्वाकांक्षी मुलांना पुढे येण्यास संधी मिळणार नाही. असे शिक्षण कनिष्ठ दर्जाचे समजले जाईल. ग्रामीण आणि नागरी असा भेद अधिकच वाढेल. याउलट ग्रामीण शिक्षण भिन्न व स्वतंत्र असावे, असे म्हणणारा दुसरा पक्ष आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे जाणाऱ्या मुलांचा ओघ थांबविला पाहिजे. त्याकरिता प्रारंभापासूनच त्यांना कृषिप्रवण शिक्षण द्यावे. शहरी अभ्यासक्रम या मुलांना अवघड वाटतो त्यामुळे शाळेतील गळती वाढते. प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत ग्रामीण शिक्षणाची निराळी पद्धती योजल्यास ग्रामोद्धाराकरिता कार्यकर्ते मिळू शकतील. तथापि ग्रामीण शिक्षणाची योजना करताना या दोन्ही मतांना टाकून मधला मार्ग काढावा लागतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व वैयक्तिक विकासासाठी सर्वसामान्य शिक्षण समान असावे आणि ग्रामीण व शहरी व्यवसायांच्या दृष्टीने पुढील शिक्षणात फरक ठेवावा, अशा भूमिकेमुळे सर्वांचे समाधान होऊ शकेल.

मागासलेल्या देशांत ग्रामीण शिक्षणाच्या दोन महत्त्वाच्या समस्या असतात. एक म्हणजे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची सोय करणे. दुसरी म्हणजे आयुष्यात कधीच शिक्षण न मिळालेल्या प्रौढ ग्रामीण जनतेला साक्षरता, आरोग्य, कृषिशास्त्र, हस्तव्यवसाय, समाजजीवन इ. विषयांचे शिक्षण देऊन सुसंस्कृत करणे. यात प्रौढ शिक्षण व ग्रामोद्धार या दोहोंची सांगड घातली जाते. ग्रामीण शिक्षणाच्या व ग्रामोद्धाराच्या समस्या पुढारलेल्या आणि मागासलेल्या राष्ट्रांनी आपापल्या परिस्थितीप्रमाणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.