गोव्यातील गणेशोत्सव

गणेशचतुर्थी हा गोव्यातील सगळ्यात मोठा सण असून दसरा व दिवाळीपेक्षासुद्धा इथे गणेशचतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

गोव्याच्या लोकांना मासे (कोकणीत 'नुस्ते') प्रिय असले तरीसुद्धा (तसे गोव्यातसुद्धा बरेच लोक शुद्ध शाकाहारी लोक आहेत.) श्रावण महिना ते गणेशचतुर्थी होईपर्यंत इथले लोक शुद्ध शाकाहारी असतात. शाकाहाराला कोकणीत 'शिवराक' म्हणले जाते.

इथले पारंपारिक मूर्तिकार साधारण दोन तीन महिन्याआधी त्यांच्या कामाला सुरुवात करतात. चिकणमाती आणून ते रंग देण्यापर्यंतची सगळी कामे श्रावण संपेपर्यंत आटोपली जातात. श्रावण संपतो आणि घरोघरी खरेदी सुरू होते. सजावटीचे सामान, स्वयंपाकाच्या वस्तू, माटोळीच्या वस्तू (माटोळी? सांगतो पुढे!), फटाके इ.ची खरेदी होते. घराला रंगरंगोटी केली जाते.

त्यानंतर घरोघरी करंज्या केल्या जातात. येथील गणेशोत्सवाचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे मोदकांपेक्षा मोठा मान करंजीचा. ओल्या नारळाच्या, सुक्या खोबऱ्याच्या, तिखट असे बरेच प्रकार केले जातात.

गणेशचतुर्थीच्या सणाला खाद्यपदार्थांचं खास वैशिष्ट्य आहे. गणपतीच्या नैवेद्याच्या मोदक व लाडू याबरोबर खोबऱ्याचं पुरण भरलेल्या करंज्या आवश्यक आहेत. ख्रिस्ती समाजात या करंज्या ख्रिसमसच्या प्रसंगी करण्याची प्रथा आहे. गणपतीबरोबर उंदीर या गणेशाच्या बाहनाला स्वतंत्रपणे नैवेद्य दाखविला जातो. गौरीसाठी खीर हवी असते. दुसऱ्या म्हणजे पंचमीच्या दिवशी पातोळ्या या पदार्थाचा नैवेद्य आवश्यक आहे.[] घरातील गणपती गोव्यात दीड दिवसांचा असतो. नवस असला तर पाच, सात अगर नऊ दिवस गणपती राहतो.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ खेडेकर, विनायक. लोकसरीता. गोवा: विनायक खेडेकर. p. 104.
  2. ^ खेडेकर, विनायक. लोकसरीता. गोवा: विनायक खेडेकर. p. 105.