कर्जत तालुक्यात वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आझाद दस्ता’ ही क्रांतिकारी चळवळ देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाली होती. या लढय़ात पहिली उडी घेतली ती नेरळ जवळच्या मानिवली गावातील आगरी समाजातील ६५ वर्षाच्या गोमाजी रामा पाटील यांनी. काका नावाने परिचित असलेले गोमाजी पाटील भाईंच्या आझाद दस्त्यात सहभागी झाल्यावर त्यांच्याबरोबर मानिवली गावातील झिपरू चांगो गवळी आणि सीताराम मालू गवळी हे दोघेही या लढय़ात सक्रियपणे सामील झाले. भाई कोतवाल आणि भाऊसाहेब राऊत यांनी व्हॉलेंटरी शाळा निर्माण करून सर्वप्रथम ब्रिटिश राज्यकर्त्यांना इशारा दिला. मानिवली गावातील शाळेत शिंदे गुरुजी शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र त्यातूनही ते लढय़ाला वेळ देत होते. मात्र लढा जसा परिसर सोडून दूर गेला, तसे सीताराम गवळीही दुरावले. तर लढय़ाच्या अखेरच्या टप्प्यात गोमाजी पाटील यांचा एकुलता एक पुत्र हिराजी हा ब्रिटिश पोलिसांच्या जाचाला कंटाळून आझाद दस्त्याला जाऊन मिळाला.

यानंतर भाई कोतवाल यांचा मुक्काम मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे असताना फितुरीमुळे ब्रिटिशांना त्यांचा ठावठिकाणा समजला आणि २ जानेवारी १९४३ रोजी पहाटे त्यांच्यावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. यात भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील यांचा पुत्र हिराजी यालाही हौतात्म्य आले. अशाप्रकारे देशासाठी मानिवली गावाने देशासाठी चार क्रांतिवीर आणि एक हुतात्मा दिला. मात्र आज या हौतात्म्याला ७३ वष्रे पूर्ण होत असताना याच मानिवली गावात या वीरांच्या आठवणी विस्मृतीत गेल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने उभारलेले स्मारक वगळता मानिवलीकरांनी या वीरांची एकही ऐतिहासिक बाब जपलेली नाही.

हिराजी पाटील यांचे राहते घर उद्ध्वस्त झाले आहे. तर झिपरू गवळी यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांची मुलगी कोदिवले येथे राहत आहे. त्यांचेही घर आता अस्तित्वात नाही. मध्यंतरीच्या काळात मानिवलीचे क्रांतिवीर व वीरपुत्राचे पिता गोमाजी पाटील (काका) यांच्या जीवनावर ‘स्वातंत्र्यवीर गोमाजी पाटील’ हे पुस्तक लिहिण्यात आले.