गोपिकाबाई (जन्म : इ.स. १७२५; - इ.स. १७८८) या इतिहासाकालातील महाराष्ट्राचे पंतप्रधान पेशवे यांच्या घरातील कर्त्या स्त्री होत्या.

श्रीमंत गोपिकाबाई साहेब पेशवे (पेशवीणबाई)
जन्म इ.स. १७२५
गुहागर
मृत्यू इ.स. १७८८
गंगापूर
निवासस्थान शनिवार‌ वाडा महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे पेशवीणबाई
नागरिकत्व भारतीय
पेशा पेशवे
धर्म हिंदू
जोडीदार श्रीमंत नानासाहेब पेशवे
अपत्ये विश्वासराव, माधवराव (थोरले), नारायणराव
वडील रास्ते गुहागर


बालपण

संपादन

गोपिकाबाईंचा जन्म १७२५ साली कोकणात गुहागर येथे झाला. त्यांचे वडील रास्ते हे गुहागर येथे सावकार होते. ते वसुलीची कामेही करीत. शाहू महाराजांनी सातारची गादी स्वतःकडे घेतल्यानंतर नशीब काढण्यासाठी रास्ते कुटुंब सातारला आले. सातारजवळच्या वाई गावी रास्ते यांचे वास्तव्य होते.[]

लग्न आणि संसार

संपादन

एकवर्षी दिवाळीत शाहू महाराज रास्ते यांच्याकडे आले होते. तिथे त्यांनी गोपिकाबाईंना बघितले. शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन गोपिकाबाईंचे व नानासाहेब पेशव्यांचे लग्न ठरविले. १७३० मध्ये नानासाहेब व गोपिकाबाई यांचा विवाह झाला. तेव्हा गोपिकाबाई फक्त ५ वर्षांच्या होत्या. घरातल्या वातावरणामुळे आणि मुळातच हुशार असल्याने गोपिकाबाई लवकरच प्रगल्भ जबाबदार स्त्री बनल्या. गोपिकाबाईंना उत्तम लिहिता वाचता येत होते. नात्यातल्या स्त्रियांना पत्रे लिहिण्याची त्यांना हौस होती. नानासाहेब पेशवे यांची पत्नी म्हणून त्यांना योग्य ती साथ देत शनिवारवाड्यात पेशव्यांच्या घरातील कामे त्या स्वतः लक्ष घालून करून घेत. मोठा मुलगा विश्वासराव, मधला माधवराव व धाकटा नारायणराव असे तीन मुलगे त्यांना झाले. पानिपतच्या युद्धातील पराभवाचा फार मोठा आघात जसा मराठी राज्यावर झाला होता. तसाच तो पेशव्यांच्या घरावरही झाला होता. पराभवाच्या धक्क्याने नानासाहेब पेशवे खचले होतेच. शिवाय मुलगा विश्वास युद्धात मरण पावला होता. पुतण्या बेपत्ता झाला होता. मुलाच्या आणि दीराच्या दुःखाने गोपिकाबाई व्याकुळ झाल्या होत्या. परंतु त्याही परिस्थितीत नानासाहेबांना साथ देत होत्या. पानिपतच्या युद्धानंतर काही महिन्यातच नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. गोपिकाबाईंवर आणखीनच एक आघात झाला. नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूनंतर माधवरावांना पेशवेपद मिळाले, त्यावेळी गोपिकाबाई माधवरावांना वेळोवेळी सल्ला देत असत. गोपिकाबाई हुशार होत्या, तशाच करारी आणि हट्टीसुद्धा होत्या. माधवरावांशी झालेल्या वादामुळे त्या शनिवारवाडा सोडून नाशिकजवळ गंगापूर येथे जाऊन राहिल्या. परत शनिवार वाड्यात आल्या नाहीत. तीनही मुलांचा मृत्यू त्यांना पहावा लागला. नारायणरावांच्या मृत्यूनंतर लहान वयात त्यांचा मुलगा सवाई माधवराव पेशवा झाला. तेव्हा गोपिकाबाईंनी नातवाला अनेक पत्रे पाठवून वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केला. अभ्यास, व्यायाम कसा करावा येथपासून कसे वागावे, कसे बोलावे. हाताखालच्या माणसांना काबूत कसे ठेवावे इ.विषयी सूचना त्यांनी केल्या आहेत. गंगापूर येथे वयाच्या ६३व्या वर्षी इ.स. १७८८ साली गोपिकाबाईंचे निधन झाले. गोपिकाबाईंचे तरुणपण वैभवात मानाने गेले. उतारवयात अनेक आघात सहन करीत त्यांना राहावे लागले. बुद्धिमत्ता, धैर्य, महत्त्वाकांक्षा, स्वतःच्या मोठेपणाची जाणीव, चाणाक्षपणा असे अनेक गुण त्यांच्यात होते. करारी आणि जिद्दी स्त्री म्हणूनच गोपिकाबाईंचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ३५. ISBN 978-81-7425-310-1.
  2. ^ "WikiVisually.com". wikivisually.com. 2018-07-20 रोजी पाहिले.