गुलाबी डोक्याचे बदक
इंग्रजी नाव : Pink-headed Duck
शास्त्रीय नाव : Rhodonessa caryophyllacea
हा एके काळी पूर्व भारतात आढळणारा बदक जातीतील पक्षी. साधारणपणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला हा पक्षी नामशेष झाला. शेवटची अधिकृत नोंद १९३५ सालातील आहे. याच्या डोक्यावरच्या अतिशय सुंदर गुलाबी पिसांसाठी आणि मांस खाण्यासाठी याची अतोनात शिकार झाली.
जुन्या नोंदींप्रमाणे काही आदिवासी पुरुष आपल्या टोपीत याची पिसे लावत असल्याचे दिसते. चित्रकार ए. ए.आलमेलकर यांनी काढलेल्या काही चित्रांमध्ये अरुण बाड्डाचे चित्र पहायला मिळते.
पूर्व विदर्भात याला अरुण बाड्डा या नावाने ओळखले जाते. अमरावती येथे अरुण बाड्डा आणि गोंदियामधल्या भंडारा जिल्ह्यात या पक्ष्यास कामऱ्या बाड्डा, गुलाबी तलाता बाड्डा म्हणतात. तसेच हिंदीमध्ये गुलाब सिर, लाल सिरा, संस्कृतमध्ये पटलोत्तमांग हंसक, रक्तशीर्षक म्हणतात.
नर व मादी हे अंदाजाने बदकाएवढे असतात. नराचा वरील रंग हा कळपात उदी असतो. त्याचा खालचा भाग हा फिक्कट गुलाबी रंगाचा असतो तो उडताना पंखांवरील बदामी पट्टी ठळक दिसते डोक्यावर अंशतः तुऱ्यासारखी दिसणारी पिसांची लव आणि डोक्याचा रंग गुलाबी असतो व चोचीचा रंग नवीन टिपकागदासारखा असतो तर पंखांखालचा रंग शिंपल्यासारखा लाल असतो.
मादीच्या शरीराचा खालच्या आणि वरच्या भागाचा रंग हा फिक्कट उदी असतो. पंखावर पिवळसर उदी बदामी पट्टी असते. तिचे डोके हे गुलाबी रंगाचे असते, परंतु नराच्या बाबतीत दिसून येणारा डोक्याच्या रंगाचा ठळक आखीवपणा मादीत दिसून येत नाही. मादीची मान ही लांब शेलाटी असते.
हा पक्षी फार पूर्वी बिहार ते आसाममध्ये आढळायचा, हल्ली मणिपूर आणि ओरिसा भागात आढळतो. पंजाबात, महाराष्ट्रात आणि तामिळनाडूत एखाद-दुसरे भटके गुलाबी डोक्याचे बदक क्वचितच दिसून येत असे. १९३५ सालानंतर त्याचा खात्रीलायक असा ठावठिकाणा राहिला नाही. हा बिहारमधील मानपुरा सरोवरात असण्याची दाट शक्यता आहे.
हा पक्षी बहुतकरून जंगलातील तळी आणि झिलाणी येथे राहतो.
संदर्भ
संपादनपुस्तकाचे नाव:-पक्षिकोष
लेखकाचे नाव:-मारुती चितमपल्ली