श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे.[१]

श्रीपाद श्रीवल्लभ

ग्रंथ कर्ता संपादन

सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे.[२] इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असे मानले जाते.[३] ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर हे आपस्तंब शाखेचे ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव साखरे असे होते असे या ग्रंथात लिहिलेले आढळून येते.[३] महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विशेष प्रसार आहे.

मूळ ग्रंथ आणि अनुवाद संपादन

या मूळ मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. हे संस्कृत गुरुचरित्र बहुशः अनुष्टुभ छंदात रचले आहे. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात.

मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली. कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत.

ग्रंथातील विषय संपादन

गुरुचरित्र[४] या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते. अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.गुरुची कृपा प्राप्त करणे, ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे.[२] श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत.[५] त्यामुळे त्यांच्या विषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते.[३]

विविध व्रत- वैकल्ये, तीर्थक्षेत्र आणि यात्रा यांची वर्णने, ब्राह्मणाने कसे व्वागावे याचे नियम यात सांगितले आहेत. त्या जोडीने अश्वथ, औदुंबर , भस्म इ. दत्त संप्रदायाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना यात विशद केल्या आहेत , त्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. अंगाला भस्म विलेपन कसे करावे, शिवपूजा कशी करावी याचेही मार्गदर्शन ग्रंथात केलेले आहे. महिलांसाठी पातिव्रत्य आणि आतिथ्य म्हणजे अतिथी सत्कार याचे महत्त्व या ग्रंथाने विशद करून सांगितले आहे.[३]

  • ऐतिहासिक संदर्भ- ज्या काळात हा ग्रंथ रचला गेला आहे त्या काळात महाराष्ट्रात आदिलशाही आणि निजामशाही यांची राजवट होती. त्यामुळे धर्माधर्मात तेढ न वाढता समाजात शांतता प्रस्थापित व्हावी याविषयी विवेचन या ग्रंथात केलेले दिसते.

पारायण संपादन

गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो. ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणा-या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर ईशचिंतन करावे. पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे.[६]

संशोधन संपादन

गुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा रा.चिं. ढेरे यांचा कयास आहे. मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही.सध्या उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. त्यावेळी ती रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असू शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे. मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे. असे मानले जाते की गुरुचरित्र या ग्रंथात वैदिक आणि अवैदिक दोन्ही परंपरांचा विचार नोंदविला गेला आहे पण अद्याप त्यावर आवश्यक संशोधन झालेले नाही.[३]

गद्य गुरुचरित्र संपादन

अनेक जणांनी पद्यमय गुरुचरित्राचे गद्यात रूपांतर केले आहे. त्यांपैकी एक म्हणजे बाळ वामनभाई पंचभाई. यांनी लिहिलेल्या ’श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे’ या पुस्तकात गुरुचरित्राच्या ५२ही अध्यायांतील कथासार साध्या सोप्या मराठीत शब्दबद्ध केले आहे.

एम.ए.पी‍एच.डी असलेल्या डॉ. सीताराम गणेश देसाई (गाडगीळ/वैद्य) यांनी गुरुचरित्राच्या ओवीबद्ध पोथीचे गोष्टीरूपात गद्य निवेदन त्यांच्या ’भावार्थ गुरुचरित्र’ या पुस्तकातून केले आहे. एकूण ५२ अध्याय यात कथारूपाने आले आहेत. श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांचा भक्त नामकरणी हा गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापूरला दर्शनासाठी निघाला असता सिद्धमुनी त्याला सृष्टीची उत्पत्ती, चार युगे यांची माहिती देऊन गुरुभक्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा दत्त अवतार, श्रीपादवल्लभ यांचे चरित्र व गुरुमहिमा सांगणाऱ्या अनेक कथा कथन करतात. त्या सर्व यात अगदी सोप्या भाषेत दिल्या आहेत.

त्यानंतर श्रीगुरुचरित्र व श्रीदत्त संप्रदाय, श्रीगुरुचरित्राचे लेखक, विविध पोथ्यांमधील फरक, सप्ताहवाचन पद्धती, वाचनाची फलश्रुती, गुरुगीतेचा भावार्थ, गुरुचरित्रातील कानडी पदांचा मराठी शब्दार्थ, श्रीरंगावधूतस्वामीविरचित दत्तबावनी, श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित तीन दत्तस्तोत्रे व करुणात्रिपदी, श्रीनारदविरचित दत्तस्तोत्र, श्रीशंकराचार्याचे गुरुअष्टक, श्रीदत्तसंप्रदायाचा परिचय, काही प्रमुख दत्तक्षेत्रे आदींची माहिती त्यांनी यात दिली आहे.

गुरुचरित्राच्या हस्तलिखित आवृत्त्या संपादन

हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांच्या सांगण्यानुसार गुरुचरित्राची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत इ.स. १६९५ची आहे. या प्रतीत ५१ अध्याय आहेत. आतापर्यंत विविध संस्थांमधून गुरुचरित्राची १०० हस्तलिखिते जमा करण्यात आली आहेत. त्यांतील ३२ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्रांत आहेत, तर भारत इतिहास संशोधक मंडळात १५ हस्तलिखिते आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूट, वैदिक संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेजटिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्ये सुमारे ५० हस्तलिखिते आहेत. त्यांमध्ये ५२ अध्यायी, एक्कावन्न श्लोकी, लघुसंहिता, गुरुचरित्र सार आणि संस्कृत रूपांतर अशा हस्तलिखितांचा समावेश आहे.

वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत सरदार किबे यांच्या संग्रहातील इ.स. १८६२मधील सचित्र हस्तलिखित आहे. त्यामध्ये दत्ताचे एक दुर्मिळ रंगीत चित्र आहे. मात्र या चित्रात दत्ताच्या मागे गाय काढलेली नाही.

हे सुद्धा पहा संपादन

 
विकिस्रोत
गुरुचरित्र हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भ संपादन

  1. ^ Samarth, Shree Swami; Kendra, Vishwa Kalyan (2008-08-01). Guru Charitra (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 9788120733480.
  2. ^ a b Panchabhai, Shri Bal W. (2013-07-22). Shree Gurucharitra Jase Aahe Tase / Nachiket Prakashan: श्री गुरुचरित्र जसे आहे तसे. Nachiket Prakashan.
  3. ^ a b c d e "श्री गुरुचरित्र". http://www.dattamaharaj.com. ३.१२.२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  4. ^ "Shri Swami Samarth Punyatithi 2022 : गुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम". Maharashtra Times. 2023-02-26 रोजी पाहिले.
  5. ^ Prabhu, Dr V. R. (2004-01-01). Guru Charitra (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. ISBN 978-81-7992-419-8.
  6. ^ सय्यद, झियाउद्दीन (१८.१२.२०१५). "उपासना गुरुचरित्राची". ४.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)